मुंबई । प्रतिनिधी 16 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कंत्राटी तत्वावर नेमण्यात आलेल्या शिक्षण सेवकांना तुटपुंजे वेतन देण्यात येते. शिक्षकांचे काम भावी पिढीला घडवणारे आहे. अश्या शिक्षकाला तुटपुंजे वेतन देणे योग्य नाही. हे किमान वेतन कायदयाचे उल्लंघन करणारे व अन्यायकारक आहे. यामुळे शिक्षक सेवकांच्या कामाचा दर्जा लक्षात घेऊन त्यांचे वेतन वाढवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सईदा खान यांचे पत्र शिक्षण समिती अध्यक्ष गुडेकर यांनी येत्या सोमवारच्या (२० नोव्हेंबर) बैठकीपुढे चर्चेसाठी ठेवले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. शिक्षण सेवक हा ज्ञान देणारा पेशा असून त्याकडे खूप आदराने पाहिले जाते. शिक्षकी पेशा हा भावी पिढी घडवणारा विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व विचार देणारा आहे. या पदाकरिता नियुक्ती करताना कोणत्याही शाखेची पदवी व डीएड हि अर्हता आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यांना टेक्निकल एलिजिबिलिटी टेस्ट (TET) द्यावी लागते. अश्या शिक्षण सेवकांना केवळ सहा हजार रुपये इतके कमी वेतन देण्यात येते. या शिक्षक सेवकांना इतके कमी वेतन देणे म्हणजे किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणारे व अन्यायकारक आहे. मात्र कंत्राटी तत्वावर नेमलेल्या सुरक्षा रक्षक व सफाई कामगारास दरमहा १५ हजार ७०० रुपये इतके वेतन दिले जाते. याचा गांभीर्याने विचारत करत महापालिका शाळांमधील कंत्राटी तत्वावर नेमण्यात आलेल्या शिक्षक सेवक या वर्गास त्यांच्या कामाचा दर्जा लक्षात घेऊन त्यांना योग्य ते वेतन वाढवून निश्चित करण्यात यावे अशी मागणी सईदा खान पत्राद्वारे केली आहे.