मुंबई । प्रतिनिधी 16 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्याना तीन वर्षांपूर्वी टॅब वाटप करण्यास सुरुवात करण्यात आले. मात्र या वर्षी नववीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे टॅब लालफितीत अडकले आहेत. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. मात्र शाळा सुरु होऊन पाच महिने उलटले तरी विद्यार्थ्यांच्या हातात टॅब मिळालेले नाही. पालिका प्रशासन अद्याप निविदा काढण्यात मग्न असून सुमारे 13 हजार टॅब खरेदीला प्रशासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
टॅब योजना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ड्रीम संकल्पना आहे. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून टॅब देण्याची योजना सुरु करण्यात आली. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश य़ा योजनेमागे आहे. मात्र वर्ष संपायला आले तरी प्रशासन निविदा प्रक्रियेत अडकली आहे. इयत्ता ९ वीचा अभ्यासक्रम बदलल्याने ९ वीतील मुलांचे जुने टँब ८ वीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ९ वीचे विद्यार्थ्यांना नवीन टॅब खरेदीकरीता निविदा प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत टॅब खरेदी करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र मागील पाच महिने इयत्ता नववीचे विद्यार्थी टँबपासून वंचित राहिले आहेत. विद्यार्थ्यांना नवीन टॅब मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा आणि निविदा प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करा असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र प्रशासनाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने विद्यार्थ्यांना अजूनही टॅबची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही टॅब मुलांपर्य़ंत वेळेत मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
निविदा प्रकिया अंतीम टप्प्यात -
इयत्ता नववीच्या मुलांसाठी 13 हजार टॅब खरेदीची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. दोन दिवसांत टॅबचे दर ठरवण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. येत्या महिनाभरात मुलांपर्यंत टॅब पोहचतील.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका