मुंबई । प्रतिनिधी 6 Nov 2017 -
मुंबईमधील अनेक भूखंडांवर अतिक्रमण होत असते. या अतिक्रमणामुळे पालिकेला या भूखंडांचा विकास करताना अडथळा निर्माण होत असतो. अंधेरी चकाला येथील पालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण हटवून 13 हजार 321.67 चौरस मीटर जागेवर भव्य उद्यान उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत मंजूर झाला असून हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अंधेरी पूर्व येथील या जागेचा उपयोग उद्यानासाठी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येथील मोकळी जागा लवकरच मुंबईकरांसाठी खुली होणार आहे. या जमिनीची किंमत 194 कोटी रुपये असून पुनर्वसनाच्या खर्चासह पालिकेला हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी दोनशे कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईतील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया किचकट झाली आहे. सुधार समितीत याला हिरवा कंदील मिळाल्याने या प्रक्रियेला आता वेग आला आहे. 1991 च्या विकास नियोजन आराखड्यात अंधेरी-घाटकोपर जोड रस्त्यावरील बिसलेरी कंपनीशेजारी असलेला हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित करण्यात आला होता. हे आरक्षण रद्द होऊ नये यासाठी 2034 च्या विकास आराखड्यात पुन्हा उद्यानासाठीच तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे 13 हजार 321.67 चौरस मीटरचा भूखंड ताब्यात घेण्याची खरेदी -सूचना या जमिनीच्या मालकाने पालिकेला बजावली होती. या भूखंडावर मार्बलचे मोठे दुकान आहे. मात्र भूसंपादन कायद्यानुसार पालिकेला या दुकानाचे पुनर्वसन करणे अनिवार्य आहे. भूखंडाच्या पूर्वेला संरक्षक भिंत असून दक्षिण व पश्चिम बाजूला बांधीव नाला आहे. तर पूर्वेकडे एक मंदिर अस्तित्वात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवणे आणि पुनर्वसन करण्यासाठी पालिकेला तब्बल 200 कोटीचा खर्च येणार आहे. दरम्यान जागेची पाहणी करण्यात आल्याने लवकरच येथील जागा मोकळी होऊन येथे भव्य उद्यान साकारणार आहे.