मुंबई | प्रतिनिधी 8 Nov 2017 -
निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केलेली जोगेश्वरी येथील प्रभाग क्रमांक ६२ ची पोट निवडणूक स्थगित करण्यात यावी, असे पत्र दुस-याच दिवशी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनाला दिले आहे. लघुवाद न्यायलयाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत या निवडणूकीला शिवसेनेने उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती. याबाबतचे न्यायालयाचे निकाल बुधवारी शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांनी निवडणूक आयोग आणि पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला.
अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र लघु वाद न्यायायालने अवैध ठरवल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद बाद ठरवण्यात आले. या प्रभागात दुसर्या क्रमांकाची मते मिळवणारे शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांनी या प्रकरणी लघु वाद न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र काल राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २१ आणि ६२ ची पोटनिवडणूक जाहीर केली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राजू पेडणेकर यांनी आधीच उच्च न्यायालयात जाऊन या प्रभागाच्या पोटनिवडणूकीला स्थगिती मागितली होती. लघुवाद न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या प्रभागात निवडणूक घेऊ नये, असे आदेश ३ नोव्हेंबरला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निकालाची प्रत बुधवारी पेडणेकर यांच्या वकीलांनी राज्य निवडणूक आयोगाला आणि पालिकेच्या विधी विभागाला सादर केली. त्यामुऴे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करावी तसेच या निवडणूकीचा कार्यक्रम लावू नये असे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.