मुंबई - १ नोव्हेंबर २०१७ -
दक्षिण मुंबईतील ' डी ' विभागातील कमला नेहरू उद्यान येथील पालिकेच्या जलविभागाच्या ताब्यात असलेले सेवा निवासस्थान शासकीय अधिकारी वापरत आहेत. सदर बाबतीत वारंवार सूचना देऊनही ते निवासस्थान संबंधित अधिकाऱ्यांनी रिक्त केलेले नाही. सदर मालमत्ता ही पालिकेची असून ते निवासस्थान कोणाला द्यायचे याचा अधिकार महापौर गटनेते व आयुक्तांना आहेत. त्यामुळे पालिकेच्या ताब्यातील हे निवासस्थान रिक्त करून घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते रविराजा यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे.
दक्षिण मुंबईतील कमला नेहरू उद्यानातील जलविभागाच्या ताब्यात असणारे पालिकेचे निवासस्थान तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे याना राहण्यासाठी देण्यात आले होते . काही महिन्यापूर्वी त्यांची बदली शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात झाली. मात्र बदली झाल्यानंतरही दराडे यांनी सदर निवासस्थान सोडलेले नाही . त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी ते अद्यापपर्यंत रिक्त केलेले नाही उलट सदर मालमत्ता पालिकेची असतानाही शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पालिकेलाच नोटीस दिली आहे . सदर मालमत्ता पालिकेची असून कोणाला द्यायचे याचा अधिकार फक्त पालिकेला आहे. मुंबईच्या महापौरांना वीर जिजामाता उद्यानातील निवासस्थानात पाठविण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु आहेत. मात्र महापौरांनी त्याला विरोध करून मलबार येथील सदर निवासस्थान देण्याची मागणी केली आहे . मुंबईच्या प्रथम नागरिकाला सदर निवासस्थान न देता शासनाच्या एका अधिकाऱ्याला सदर निवासस्थान देणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आयुक्तांनी हे निवासस्थान शासनाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्त करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.