मुंबई | प्रतिनिधी 10 Nov 2017 -
मुंबईमधील प्रकल्पबाधितांना महानगरपालिकेकडून पीएपीअंतर्गत गाळे उपलब्ध करून दिले जातात. मात्र महानगरपालिकेकडे पीएपीअंतर्गत दिले जाणारे गाळे उपलब्ध नसल्याने अश्या बाधितांना रेडी रेकनरच्या सध्याच्या दरानुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. स्थायी समितीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. या निर्णयाची महापालिका सभागृहाच्या मंजूरीनंतर अंमलबजावणी केली जाणार आहे.
प्रकल्पबाधितांना पर्यायी व्यावसायिक गाळे देण्याच्या धोरणातील बदलाला पालिकेच्या स्थायी समितीने गेल्या ऑक्टोबरमध्ये मंजूरी दिली होती. स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्ताव मंजूरीसाठी आणला होता. व्यावसायिक गाळ्यांसाठी 2011-12 च्या रेडीरकनरच्या दरानुसार नुकसान भरपाई देण्यात येत होती. मात्र आता प्रकल्पबाधितांच्या व्यावसायिक गाळ्यांसाठी 1 जानेवारी 2017 च्या रेडी रेकनरच्या दरानुसार नुकसान भरपाई मिळावी, अशी उपसुचना शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीत मांडली होती. या उपसुचनेसह याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. सार्वजनिक उद्दीष्ठांसाठी अतिक्रमित बांधकामाच्या पात्र व्यक्तींना राज्य शासनाच्या धोरणानुसार पर्यायी जागा देवून निष्काशित केले जाते. पालिकेने सध्या हाती घेतलेल्या विविध प्रकल्पामुळे पात्र ठरलेल्या प्रकल्पबाधितांची संख्या सुमारे 1 हजार 574 इतकी आहे. त्यांना सुमारे 2 लाख 83 हजार 320 चौरस फूट क्षेत्रफळ जागेची आवश्यकता आहे. मात्र, बाधितांना देण्यासाठी पालिकेकडे पर्यायी गाळे नसल्याने व्यावसायिक गाळ्यांच्या रेडी रेकनरच्या दरानुसार संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.