मुंबई । प्रतिनिधी 16 Nov 2017 -
महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. सलग दोन दिवस करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान 19 व्यावसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. तसेच जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर मधील वाहनतळ जागा निष्कासित करण्यात आला आहे. एकूण 20 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली, अशी माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.
अंधेरी पश्चिम परिसरात असणा-या जुहू वर्सेावा लिंक रोड व स्वामी विवेकानंद मार्ग यांना जोडणा-या जे. व्ही. एल. आर. विस्तारीत मार्गावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. या बांधकामांमुळे 120 फूट रुंद असणा-या या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 90 फूटापर्यंत कमी झाली होती. परिमंडळ – 4 चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच अंधेरी पश्चिम परिसरातीलच जे. व्ही. एल. आर. विस्तारीत मार्गावर असणा-या इन्फिनीटी मॉल जवळील परिसरात महापालिकेच्या भूखंडावर काही अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती. या अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई महापालिका अधिनियम कलम 314 नुसार कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली होती. मात्र न्यायालयाद्वारे या बाबत स्थगिती आदेश देण्यात आला होता. ही स्थगिती नुकतीच रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेने कारवाई केली. येथील १९ व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. यामुळे सदर रस्त्याची रुंदी वाढण्यास मदत होण्यासह परिसरातील वाहतूक सुरळीत होऊ शकणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.