मुंबई । अजेयकुमार जाधव -
मुंबई महानगरपालिकेत सत्तेपासून लांब राहिलेल्या भाजपाने शिवसेनेला सत्ता बहाल केली. सत्ताधारी म्हणून निर्णय घेताना भाजपाने शिवसेनेला अनेक वेळा कोंडीत पकडले. भाजपाला मुंबईवर आपला महापौर बसवायचा आहे. त्यासाठी संख्याबळही कमी पडत आहे. या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी व शिवसेनेला चोहोबाजूने कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने समाजवादी पक्षाच्या खांदयावर बंदूक ठेवून सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी भाजपाने आपल्या इशाऱ्यावर चालणाऱ्या समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांना पुढे केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीपूर्वी पासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना व भाजपा हे दोन्ही मित्र पक्ष एकमेकांचे राजकीय वैरी झाले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. अश्या परिस्थितीत शिवसेना आणि भाजपाच्या भांडणात मुंबईकरांचे प्रश्न आणि समस्या बाजूला राहत आहेत. यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन रईस शेख यांनी सर्व विरोधी पक्षातील गटनेत्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केले आहे. भाजपा पहारेकऱ्यांची भूमिका घेत विरोधक असल्याचे नाटक करीत आहे. यामुळे पालिकेत राजकीय गुंतागुंत वाढली आहे. भाजपचा केवळ शिवसेनेचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा डाव आखत आहे. तर शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने ग्रासले असल्याचे म्हटले आहे. पालिकेतील विरोधी पक्षही एकदिलाने काम करत नसल्याने त्यांचा वचक सत्ताधाऱ्यांवर राहिला नसल्याचे म्हटले आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा पालिका प्रशासन उचलीत असल्याचे रईस शेख यांनी पत्रात म्हटले आहे.
मनसेचे फुटीर सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश भाजपाला पचलेला नाही. कोंकण आयुक्तांकडे हे प्रकरण प्रलंबित असताना मनसेने संजय तुर्डे यांना गटनेते म्हणून नेमणूक केल्याचे पत्र महापौरांना दिले आहे. याबाबत सभागृहात घोषणा होण्या आधीच कोंकण आयुक्तांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता रईस शेख यांनी मनसेचे गटनेते म्हणून संजय तुर्डे यांना संबोधित करत पत्र दिले आहे. नेहमी कायद्याची भाषा करत प्रशासनाला कोंडीत पकडणाऱ्या रईस शेख यांच्याकडून ही चूक कशी झाली ? की हे पत्र कोणीतरी लिहून दिले आणि त्यावर शेख यांनी सही केली का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेत भाजपाच्या इशाऱ्यावर चालणार पक्ष म्हणून समाजवादी पक्षाची ओळख निर्माण झाली आहे. मनोज कोटक आणि रईस शेख यांच्यामधील मैत्रीही चांगली आहे. भाजपाचे गटनेते मनोज कोटक सांगतील तसेच समाजवादीचे गटनेते रईस शेख राजकीय भूमिका घेत असल्याचे पालिकेत अनेक वेळा दिसून आले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन भाजपाने केले असते तर इतर विरोधी पक्ष एकत्र आले नसते. म्हणून भाजपाने रईस शेख यांना पुढे करून काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.