मुंबई 3 Nov 2017-- केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जुन्या नोटा बंद करून नवीन नोटा चलनात आणल्या. या नोटांच्या बनावट नोटा बनविता येणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र प्रत्यक्षात बाजारात आजही बनावट नोटा चलनात असल्याचा आर्थिक फटका बेस्ट उपक्रमाला बसला आहे. बेस्टला तिकीट आणि बसपास घेताना प्रवाशांकडून तब्बल २ लाख रुपये किमतीच्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
बेस्ट उपक्रम सद्या आर्थिक संकटात आहे. य़ातून मार्ग काढण्यासाठी विविध पर्याय शोधले जात असतानाच गेल्या वर्षभरात तब्बल २ लाख ६ हजार ५५० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक फटका बसला आहे. बेस्ट उपक्रमाला एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ११९४ कोटी ५२ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. यामध्ये २ लाख ६ हजार ५५० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. या बनावट नोटांमध्ये १ हजार रुपयांच्या ८९ नोटा, ५०० रुपयांच्या १७० नोटा,१०० रुपयांच्या ४५ नोटा आढळून आल्या आहेत. बेस्ट परिवहन विभागाचे दररोजचे उत्पन्न आय.सी.आय, बँक ऑफ इंडिया, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये जमा केले जाते.
या बँकांमध्ये भरलेल्या रकमेत २ लाख ६ हजार ५५० रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये, बस तिकिटांचे जमा झालेल्या बनावट नोटांची रक्कम तब्बल १ लाख ७८ हजार ५०० रुपये इतकी तर बस पासाचे जमा झालेली बनावट नोटांची रक्कम ही ३५ हजार ५० रुपये इतकी आहे. मात्र बेस्टने काही बसपास धारकांकडून प्राप्त झालेल्या ७ हजार रुपयांच्या बनावट नोटा बदलून घेतल्या आहेत. मात्र तरीही बेस्टला एकूण उत्पन्नातील २ लाख ६ हजार ५५० रुपयांच्या बनावट नोटांचा फटका बसला आहे. बेस्ट उपक्रमाने या नोटांचे मायबाप सापडणे कठीण वाटल्याने बेस्टच्या उत्पन्नातील एवढी रक्कम ही आर्थिक फटका म्हणून कोणावरही जबाबदारी न टाकता निर्लेखित करण्याचा निर्णय घेतला, त्यास बेस्ट समितीनेही मंजुरी दिली आहे.