मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट उपक्रमाच्या बस मार्गात दर चार महिन्याने बदल केला जातो. यावेळी जास्त उत्पन्न व प्रवासी असलेल्या बसगाड्या चालू ठेवून इतर मार्गावरील बसगाड्या कमी करण्यात येतात. येत्या १ डिसेंबर पासून पासून बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या बस प्रवर्तनात बदल केले असून काही बसमार्गांवरील बसफेरीत वाढ करण्यात आली आहे. तर काही बसमार्गांच्या गंतव्यस्थानात बदल करण्यात आला असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
बसमार्ग क्रमांक १७२ वर प्लाझा ते प्रतीक्षा नगर, बस क्रमांक २९७ वर बोरिवली स्थानक पूर्व ते मिनी नगर, बस क्रमांक ३१२ वर प्रतीक्षा नगर ते राणी लक्ष्मीबाई चौक व बस क्रमांक ३३३ वर अंधेरी स्थानक पूर्व ते महाकाली गुंफा दरम्यान अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. वांद्रे रिक्लेमेशन बस स्थानक ते शेर्लि गांव दरम्यान बस क्रमांक २२० जादा क्रमांकाची बस चालविण्यात येणार असून २२० चा नवीन जादा पॅटर्न खार स्थानक पश्चिम ते पोलीस अधीक्षक कार्यालय दरम्यान चालविण्यात येईल. वांद्रे पूर्व बस स्थानक ते म्हाडा वसाहत मुलुंड दरम्यान धावणारी बस क्रमांक ३०३ वांद्रे टर्मिनस पूर्व पर्यंत जाईल. सांताकृझ स्थानक [ पूर्व ] ते अमर ब्रास स्टिल कंपनी पर्यंत जाणारी बस क्रमांक ३१३ जादा बस आता कुर्ला आगार पर्यंत जाईल.
कुलाबा बस स्थानक ते नाडकर्णी पार्क पर्यंत धावणारी बस क्रमांक ९ अँटॉप हिल येथे खंडित करण्यात येईल. बस क्रमांक ४४ इलेक्ट्रिक हाऊस पर्यंत न जाता म्युझियम पर्यंतच धावेल व या बसचा विस्तार वरळी गांव पासून वरळी आगारापर्यंत केलेला आहे. बस क्रमांक ४५ मंत्रालय येथून सुटून आदर्श नगर हुन आणिक आगाराकडे न जाता पूर्व मुक्त मार्गाने माहुल गांव पर्यंत धावेल. मुंबई सेंट्रल आगार ते विद्याविहार बस स्थानक दरम्यान धावणारी बस क्रमांक ६२ प्लाझा ते विद्याविहार पर्यंत धावणार असून हि बस टी जंक्शन, रहेजा व मच्छीमार नगरहुन जाण्याऐवजी माहीम कोळीवाडा मार्गे धावेल. बस क्रमांक ३०२ प्रतीक्षा नगर ते मुलुंड बस स्थानक ऐवजी राणी लक्ष्मी चौक ते मुलुंड दरम्यान धावेल. घाटकोपर आगार ते लोकमान्य नगर ठाणे दरम्यान धावणारी ४९७ मर्यादित बस मुलुंड स्थानक पश्चिम ते लोकमान्य नगर दरम्यान धावेल.
बस क्रमांक २५ मर्यादित आता दोन पॅटर्न मध्ये धावणार आहे. बॅकबे आगार ते राणी लक्ष्मी चौक दरम्यान एक पॅटर्न व वडाळा आगार ते विहार सरोवर दरम्यान दुसऱ्या पॅटर्नची बस धावेल. बस क्रमांक १८२ बंद करून हि बस राणी लक्ष्मी चौक ते मालवणी आगार दरम्यान धावणाऱ्या १८० मध्ये विलीनीकरण करण्यात येईल. तर सांताक्रूझ स्थानक पूर्व ते विद्याविहार स्थानक पश्चिम दरम्यान धावणाऱ्या ४३३ बसचे बस क्रमांक ३२२ मध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. ही बस आता सांताक्रूझ स्थानक पूर्वला वळसा घेऊन महंत रोडला जाईल. बस क्रमांक २ मर्यादित दुपारी १ ते ४ दरम्यान फक्त वांद्रे पूर्व बस स्थानक पर्यंत धावेल. तर बस क्रमांक १५६ ग्रॅन्ट रोड स्थानक मार्गे धावतील.