पालिका आयुक्तांनी सुचविलेल्या सुधारणांना बेस्ट समितीची मंजुरी -
मुंबई | प्रतिनिधी 14 Nov 2017 - बेस्ट उपक्रमाची बिकट आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सुचविलेल्या सुधारणांना मंजुरी देताना बेस्ट बस तिकीटदरामध्येही वाढ करण्यास बेस्ट समितीने मंजुरी दिली. भाडेवाढीत पहिल्या दोन टप्प्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसून त्यानंतर एक रुपयापासून १२ रुपयांपर्यंतही वाढ होणार आहे. त्याचबरोबर बेस्ट बस पास दरातही वाढ होणार आहे. यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे बेस्ट कामगारांना वेळेवर पगार देणेही मुश्किल झाले होते. बेस्ट हि पालिकेची अंग असल्याने बेस्ट उपक्रमास आर्थिक मदत मिळावी म्हणून बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी महापौरांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांशी तीन वेळा विशेष बैठका घेतल्या . या बैठकीस बेस्टचे महाव्यस्थापक, सदस्य पालिकेतील गटनेते, तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्तिथ होते. यावेळी आयुक्तांनी बेस्ट उपक्रमास थेट आर्थिक मदत देण्यास नकार देत बेस्टला यातून बाहेर निघण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. यामध्ये महत्वाच्या असलेल्या बस भाडेवाढीचा सूचनेस आज बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली. या व्यतिरिक्त बस ताफ्याचे पुनर्नियोजन करण्यात येणार असून त्याचबरोबर बेस्ट बसमार्गांचे प्रवर्तनात सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बेस्टमधील ब श्रेणी अधिकाऱ्याचा कार्यभत्ता खंडित करणे, मनुष्यबळाचे नियोजन. शिक्षणासाठी पाल्यांना देण्यात येणारे वित्तीय साहाय्य बंद करणे, शिष्यवृत्ती बंद करणे. गृहकर्ज वरीलअर्थसहायय व्याजाची योजना बंद करणे, अ श्रेणी अधिकाऱ्याची संख्या कमी करणे. वाहतूक भत्ता बंद करणे. वाहन कर्ज बंद करणे. नैमित्तिक रजेचे रोखीकरण स्थगित करणे, प्रोत्साहन भत्ते गोठविणे, अ व ब श्रेणीतील अधिकाऱ्यांचा प्रवास भत्ता बंद करणे इत्यादी सुधारणांना बेस्ट समितीत आज मंजुरी देण्यात आली. मात्र मान्यताप्राप्त संघटनेशी निगडित असलेल्या महागाई भत्ता गोठविणे. वैद्यकीय भत्ता खंडित करणे, उपहारगृह कंत्राटदारांना देण्यात येणारी सबसिडी योजना, कर्मचारी अधिकाऱ्यांचा रजा प्रवास सहायय भत्ता गोठविणे. रोख रक्कम हाताळणी भत्ता बंद करणे या योजनांबाबत बेस्ट समितीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. कामगारांसंदर्भातील योजनांबाबत मान्यताप्राप्त संघटना व प्रशासनातील चर्चेतून सदर विषयावर निर्णय घेणे कायद्याने बंधनकारक असल्याने या योजनांबद्दल बेस्ट समितीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
बेस्टला आर्थिक खायीतून बाहेर काढण्यासाठी मनाला न पटणारे निर्णय घेण्याची पाळी आज आमच्यावर आली असून भविष्यात बेस्ट उपक्रम टिकणे हे महत्वाचे आहे. मीही बेस्ट कामगार होतो त्यामुळे मला कामगारांप्रती पूर्ण जाणीव आहे. आर्थिक परिस्तिथीमुळे माझ्या बेस्ट कामगारांना वेळेवर पगार मिळणे हि कठीण झाले आहे. बेस्ट उपक्रम टिकला तर कामगार जगेल. हे लक्षात घेऊन माझ्या कामगारांना जगविण्यासाठी आम्हाला हा कटू निर्णय घ्यावा लागत आहे . बेस्ट चा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलीन करण्यास पालिका सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य केले आहे. सदर प्रस्ताव आयुक्तांकडून सकारात्मक रित्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना स्वीकारणे हि आपली जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून सर्वपक्षीय सदस्यांनी या उपाययोजना मंजूर कराव्यात असे भावनिक आव्हान बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केले. बेस्टला आर्थिक मदत मिळविण्यासाठी महापौरांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी मी स्वतः बेस्टबाबत सादरीकरण केले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालणे हे महत्वाचे असून आर्थिक परिस्तिथी सुधारण्यासाठी पालिका आयुक्तांनी सुचविलेल्या योज़ना मंजूर करणे हे महत्वाचे आहे. मात्र हे निर्णय कायमस्वरूपी नसल्याचेही बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितले. प्रवासी भाड्यात वाढ करताना सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेल्या कमी टप्प्याच्या बसमार्गावर कोणतीही वाढ सुचविण्यात आली नसून केवळ लांब पल्य्याच्या मार्गांसाठीच असेल असे बागडे यांनी स्पष्ट केले.
अशी होणार दरवाढ
किमी सध्याचे भाडे सुधारित भाडे
२ ८ रु ८ रु
४ १० १०
६ १४ १५
८ १६ १८
१० १८ २२
१२ २० २५
१४ २२ २८
१७ २४ ३२
२० २६ ३४
२५ २८ ३७
३० ३० ४२
३५ ३६ ४७
४० ४२ ५२
४५ ४६ ५७
१७ २४ ३२
२० २६ ३४
२५ २८ ३७
३० ३० ४२
३५ ३६ ४७
४० ४२ ५२
४५ ४६ ५७