पुढील आठवड्यात विशेष बैठक -
मुंबई । प्रतिनिधी 3 Nov 2017 -
मुंबईकरांची दुसरी लाइफलाईन असलेला बेस्ट उपक्रम आर्थिक खाईत सापडला आहे. अश्या परिस्थितीत उपक्रमाला वाचवण्यासाठी महसूल वाढवण्याचे प्रयत्न सूर असताना दुसरीकडे मात्र तिकीट देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नादुरुस्त ट्रायमॅक्स मशीनमुळे बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोटा होत आहे. या नादुरुस्त ट्रायमॅक्स मशीनच्या मुद्द्यावरून बेस्ट समिती सभेत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत महाव्यवस्थापकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. दरम्यान सर्व समिती सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी पुढील आठवड्यात एक विशेष बैठक आयोजित केली आहे, सदर बैठकीला ट्रायमॅक्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
बेस्ट उपक्रमात आधुनिक तिकीट यंत्र आणण्याचे धोरण सुमारे आठ वर्षांपूर्वी मंजूर केले गेले. त्यावेळेपासून जुन्या तिकिटांच्याबदल्यात ट्रायमॅक्स या यंत्राद्वारे बसमध्ये तिकीट देण्याची पद्धत सुरु करण्यात आली. ट्रायमॅक्स कंपनीबरोबरचे कंत्राट संपल्यानंतर नवीन कंत्राट काढण्यास बेस्ट प्रशासनाने विलंब केल्याने ट्रायमॅक्स कंपनीलाच मुदतवाढ देण्यात आली. मात्र मुदत वाढ दिल्यानंतर सदर कंपनीने पुन्हा बेस्ट उपक्रमास नवी यंत्रे न पुरावता जुनीच यंत्रे पुरवली. त्यामुळे अनेक ट्रायमॅक्स मशिन्स नादुरुस्त असल्याने अनेक वाहकांना बस प्रवाशांना तिकिटे देताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेस्टनेही ट्रायमॅक्स कंपनीकडे नवीन मशिन्स देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यावर ट्रायमॅक्स कंपनीने बेस्टला नवीन मशिन्स पुरवल्या, मात्र बेस्ट महाव्यवस्थापकांनी त्या नव्या मशिन्स मध्ये त्रुटी काढून या मशिन्स अत्याधुनिक नसल्याचे कारण देऊन परत पाठवल्या आहेत.
बेस्ट उपक्रमाकडून वापरात असलेल्या ट्रायमॅक्सच्या मशीनची संख्या कमी आहे, या मशीनची बॅटरी लवकर उतरत असल्याने त्या मशीन वारंवार चार्ज कराव्या लागतात. वारंवार मशीन चार्ज कराव्या लागत असल्याने प्रवाशांना जुन्या पद्धतीने कागदी तिकीट द्यावे लागते. हि कागदाची तिकिटेही कमी प्रमाणात असल्याने तिकिटे देताना वेळ वाया जात आहे. या कारणाने गर्दीच्या वेळी प्रवाशांना तिकिटे देणे शक्य होत नसल्याने अनेक प्रवासी तिकीट न काढताच बस मधून उतरून जातात त्यामुळे बेस्टचे रोज लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. कित्येक बस आगारात मशिन्स नसल्याने बस गाड्याच्या फेऱ्या पूर्ण होत नाहीत यामुळेही नुकसान सोसावे लागत आहे. एक बसगाडी बस आगारा बाहेर न पडल्याने दिवसाला दहा हजार रुपयांचा बेस्टला तोटा होतो. या आर्थिक नुकसानीला बेस्ट प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व बेस्ट महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्यांनी केला आहे.