अभिनेत्री माधवी जुवेकर सह कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार -
मुंबई । प्रतिनिधी 8 Nov 2017 -
मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टची आर्थिक परिस्थिती असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याची बोंब होत असताना वडाळा आगारमध्ये मात्र एका कार्यक्रमादरम्यान नाचगाणी करून पैसे उडवण्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या प्रकारामुळे बेस्टचे आगार आहे कि डान्सबार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असून उपक्रमावर चार हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच बेस्टवर विविध बँकांचे आणि महापालिकेचीही कर्ज आहे. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. पगार वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी आंदोलने उपोषणे केली, रक्षाबंधनाच्या दिवशी संपही करण्यात आला. अश्या परिस्थितीत कर्मचारी गंभीर राहून आपल्या कामात लक्ष देतील अशी अपेक्षा केली जात होती. मात्र या उलट प्रकार बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगार येथे झाल्याचे उघड झाले आहे. दसऱ्याच्या दिवशी वडाळा आगारात एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री व बेस्ट अधिकारी असलेल्या माधवी जुवेकरसह काही कर्मचारी अधिकारी अश्लील नाच गाणी करत पैसे उडवत आहेत. काही कर्मचारी आणि अधिकारी तर चक्क अभिनेत्री असलेल्या माधवी जुवेकर यांच्यावर पैसे उडवत असून माधवी जुवेकर या सुद्धा या व्हिडिओमध्ये तोंडामध्ये पैसे घेऊन नाचत असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुरक्षा आणि दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यासह अकरा अधिकारी कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. चौकशी नंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.