मुंबई । प्रतिनिधी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरपूर्वी इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाचे काम सुरु करावे, स्मारकासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी, तसेच ज्यांनी या स्मारकासाठी लढा उभारला त्यांच्याशी सरकारने चर्चा करावी, अशा मागण्या चैत्यभूमी ते इंदू मिल ‘आठवण मोर्चा’ दरम्यान करण्यात आल्या.
सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी केले, मात्र स्मारकाचे पुढील काम खोळंबले आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी सामाजिक समता मंचतर्फे मंगळवारी चैत्यभूमी ते इंदू मिलदरम्यान आठवण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेप्रसंगी विजय कांबळे म्हणाले, या स्मारकासाठी जानेवारीत राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येईल. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्मारकाच्या संदर्भात बैठका घेताना ज्यांनी स्मारकासाठी लढा दिला आहे त्यांच्याशी चर्चा करावी व स्मारकासाठी सुरुवातीपासून लढा देणार्या नेत्यांना डावलून निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली.