जागतिक किर्तीचे धावपटू धावणार -
मुंबई । प्रतिनिधी -
मानवी तस्करीच्या विरोधात काम करणाऱ्या ओएसीस इंडिया या संस्थेच्या वतीने मानवी तस्करीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ‘दि लाँग रन’ (आयएलटीआर) आणि ‘मुक्ती बाईक रॅली’चे आयोजन केले आहे. पश्चिम बंगालपासून ‘दि लाँग रन’ या मॅरेथॉनला सुरूवात झाली असून कलकत्ता, रायपूर, नागपूर, नाशीक मार्गे येऊन मुंबईतील मॅरेथॉनने त्याची सांगता होणार आहे. मुंबईतील मॅरेथॉन ही 21 व 23 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.
मुंबईत 21 नोव्हेंबर रोजी 6.30 ते 8.30 यावेळात आयोजित मॅरेथॉन हाजी अली येथून सुरु होऊन वरळी सी फेस या ठिकाणी समाप्त होईल. 23 नोव्हेंबर रोजी आयोजित मॅरेथॉन सकाळी 6.30 ते 8.30 यावेळात बलार्ड पियर्ड येथून सुरु होऊन सीएसटी मेट्रो सिनेमा या ठिकाणी संपेल. या दोन्ही मॅरेथॉन 10 किमी अंतराच्या असतील. यात 11 धावपटू सहभागी झाले आहेत, ज्यात बेल्जियमचे दोन, युकेचे तीन, अमेरिकेचा एक, रायपुरचे तीन नामवंत धावपटू आहेत. त्यांच्याबरोबर त्या त्या ठिकाणांचे स्थानिक धावपटूही सहभागी होत आहेत. पश्चिम बंगालमधून अनेक लहान मुले आणि स्त्रीयांची तस्करी होते. त्यांना कलकत्ता, रायपूर, नागपूर, नाशीक मार्गे रेल्वेद्वारे मुंबईमध्ये आणले जाते. लहान मुलांना भीक मागण्यासाठी तर लहान मुली आणि स्त्रीयांना देहविक्रीच्या अनैतिक व्यवसायात ढकलले जाते. म्हणूनच या मार्गावर ओएसीस संस्था मॅरेथॉनच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. मुक्ती बाईक रॅलीची सुरूवात 17 नोव्हेंबर रोजी बँग्लोर येथून झाली आहे.
ही रॅली मैसूर, मँग्लोर, मुरुडेश्वर, हुबळी, कोल्हापूर या मार्गे येऊन 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत आगमन होणार आहे. यात नऊ बाईकर्स सहभागी झाले आहेत. स्थानिक सामाजिक संस्था आणि शाळांच्या साहय्याने मॅरेथॉन आणि रॅलीच्या मार्गावर पथनाटय़ आणि प्रदर्शन देखील आयोजित केले जात आहे. त्याचबरोबर 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील शाळांमध्ये देखील जनजागृती केली जाणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मकीचन हॉल, मलबार हिल, मुंबई येथे दुपारी 2.30 वाजता या मोहिमेची सांगता होणार आहे. ‘दक्षिण आशिया, भारत आणि भारताबाहेर जवळपास दीड लाख महिला आणि लहान मुलांची तस्करी केली जाते. हा विषय अत्यंत गंभीर असून सरकार आणि समाजाच्या मदतीने या मानवी तस्करीच्या जाळ्य़ात अडकलेल्या स्त्रीया आणि लहान मुलांना बाहेर काढणे, त्यांना शिक्षण व प्रशिक्षण देणे व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन स्वत:च्या पायावर उभे करणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात जगण्याची नविन उमेद निर्माण करणे हे ओएसीसचे कार्य आहे’ असे ओएसीस इंडिया या सामाजिक संस्थेचे कार्यकारी संचालक मँगनिओ लुंगडीम यांनी सांगितले. या मोहिमेतून निर्माण होणारा निधी मानवी तस्करीतून बाहेर पडलेल्या लहान मुले आणि स्त्रीयांच्या पुनर्वसनासाठी वापरला जाणार आहे असेही ते अधिक माहिती देताना म्हणाले.