मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत गेले काही दिवस सकाळी ऊन तर रात्री पाऊस पडत होता. या बदलत्या हवामानाचा परिणाम मुंबईकर नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. मुंबईत 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत स्वाईन फ्लूच्या 3 नवीन रुग्णांची नोंद पालिकेच्या रुग्णालयात करण्यात आली असून डेंग्यूची लक्षणे आढळून आलेल्या संशयित 1963 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात डेंग्यूचे 124, लेप्टोचे 12, मलेरियाचे 287 तर गॅस्ट्रोचे 275 रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत डेंग्यूचे 228, लेप्टोचे 33, मलेरियाचे 577 तर गॅस्ट्रोचे 513 रुग्ण आढळले होते. यासंदर्भात पालिकेच्या साथरोग नियंत्रण विभागाशी संपर्क साधला असता “बदलत्या हवामानामुळे हे वातावरण स्वाईन फ्लूच्या आजाराचा प्रसार करण्यास पोषक असल्याने रुग्णांची नोंद होत आहे. 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळलेत. पण मागील महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. त्यामुळे आता या रुग्णसंख्येत घट व्हायला सुरूवात झाली असल्याचे विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी सांगितले.