मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची अवस्था खराब असून स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष केल जात असल्याचा आरोप नेहमीच केला जात असतो. पालिका स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने पालिकेच्या शताब्दी रूग्णालयात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातच दहा दिवसांच्या आत घडलेल्या दोन घटनांनी रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका महिला रुग्णाचा पाय तर एका महिला रुग्णाचा डोळा उंदराने चावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ज्या महिला रुग्णाचा डोळा उंदरांनी चावला आहे त्या महिला रुग्णाला पालिकेने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती आमदार मनिषा चौधरी यांनी पत्रकारांना दिली.
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ८ ऑक्टोबरला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल शांताबेन जाधव या महिलेचा पाय उंदराने कुरतडला. या महिलेला झोपेत असल्याने याबाबत काहीच कळलं नाही. सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच प्रमिला नेरुळकर या रुग्णाचाही डोळा उंदराने चाल आहे. डोळा चावल्यावर या महिलेला पालिकेने इंजेक्शन द्यायला हवे होते. मात्र असे न करता रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणायला सांगितले. या रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टारांनी १० रुपयात आणखी काय उपचार करणार असेही सुनावले आहे. या रुग्णालयात अंधाधुंदी कारभार सुरु असून सिटी स्कॅनसाठी रुग्णाला नेण्यासाठी १०० रुपये, चादर बदलण्याचे २० रुपये, पॉट देण्याचे ५० रुपये घेतले जात असल्याने रुग्ण त्रस्त असल्याची माहिती मनिषा चौधरी यांनी दिली.
शताब्दी रुग्णालयात फॉल सिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट आहे. हे उंदीर ऑपरेशन थिएटरवरच्या सिलिंगमध्येही असल्याने एखादी वायर कुर्तडल्यास शॉकसर्किट होऊ शकतो असे झाल्यास आगही लागण्याची शक्यता असल्याचे चोधरी म्हणाल्या. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयावर ताण पडत असल्याने बोरिवली येथील भगवती रुग्णालय त्वरित सुरु करावे. शताब्दी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाने वचक ठेवावा तसेच या प्रकाराबाबत महापालिका आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी राजिनामा द्यावा अश्या मागण्या चौधरी यांनी केल्या आहेत. या दोन घटनांनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय. शिवाय गेल्या वर्षी नायर रूग्णालयात देखील रूग्णाला उंदाराने चावा घेतल्याची घटना घडली होती. उंदरांच्या वावरामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. रुग्णांना इंफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेने तातडीने याबाबत उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी होतेय.