भांडुप परिसरात तक्रारदार नेहा (नावात बदल) आईसोबत राहते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे शेजाऱ्यांसोबत भांडण झाले. शेजारच्या महिलेने नेहाच्या आईच्या हाताचा चावा घेतला. जखमी आईसोबत नेहाने मुलुंडचे अग्रवाल रुग्णालय गाठले. रुग्णालयात असलेल्या पोलीस कक्षाकडे त्यांनी धाव घेतली. तेथे पोलीस हवालदार सतीश हांडे कर्तव्यावर होता. नेहाच्या आईने त्यांना घडलेला प्रकार सांगून मदत करण्यास सांगितली. यावर हांडेनी त्यांना येथून उपचाराचा अर्ज घेऊन भांडुप पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. परंतु रात्र झाल्याने या दोघींनी पोलीस कक्षातच राहण्याचे ठरविले. त्यांनी याबाबत हांडेकडे विचारणा केली. हांडेनेही त्यांना होकार दिला. नेहाच्या आईला मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागत होते. त्या तीन वेळा बाहेर गेल्या. तेव्हा नेहा एकटीच हांडेसोबत होती. याचाच फायदा घेत हांडेने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. सकाळी ५ वाजता नेहा आईसोबत बाहेर निघाली, तेव्हा नेहाने घडलेल्या प्रकार आईला सांगितला.
पोलीस काकांनी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत माझ्याशी घाणेरडे चाळे केल्याचे तिने आईला सांगितले. हे ऐकून आईलाही धक्का बसला. मुलीच्या सुरक्षेसाठी जेथे ठेवले तेथेच ती असुरक्षित होती याचा तिने स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. तेथील डॉक्टरांना याबाबत सांगत नेहाच्या आईने थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी हांडेविरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांत हांडेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विक्रोळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.
दरम्यान हांडेने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीत तक्रारदार मुलीची आई त्यांच्याकडेच भांडुपमध्ये झालेल्या भांडणाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होती. मात्र ते आपल्या हातात नसल्याने हांडेने त्यास नकार दिला होता. या रागातून त्यांनी खोटे आरोप केल्याचे हांडे यांचे म्हणणे आहे.