मुंबई । प्रतिनिधी 30 Oct 2017 -
मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांनी आपल्या पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. या फुटीर नगरसेवकांविरोधात मनसेने कोंकण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने हे सहाही नगरसेवक आज (सोमवारी 30 Oct) कोंकण आयुक्तांसमोर प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे लेखी सादर करण्याची शक्यता आहे.
मनसेमधील पदाधिकारी वरिष्ठ अश्या नगरसेवकांना किंम्मत देत नव्हते. खुद्द राज ठाकरे या नगरसेवकांना भेट देत नव्हते. यामुळे आपली राजकीय कारकिर्दीचा प्रश्न निर्माण झाल्याने मनसेच्या सात पैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिट्ठी दिली होती. मनसेमधून बाहेर पडताना आपला गट बनवत सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसनेंत प्रवेश केल्याने भाजपा आणि मनसेमध्ये खळबळ उडाली होती. यापार्श्वभूमीवर या नगरसेवकांनी करोडो रुपये घेऊन पक्ष प्रवेश केल्याचा आरोप भाजपा आणि मनसेकडून करत याची चौकशी लाच लुचपत विभाग व इडी कडून करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत मनसेने आपल्या नागरसेवकांविरोधात कोंकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे.
मनसेने केलेल्या तक्रारीनुसार फुटीर नगरसेवकांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये शिवाय त्यांना कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्यापासून रोखावे तसेच त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी केली आहे. मनसेच्या या तक्रारीनुसार कोकण आयुक्तांकडून गुरुवारी एक पत्र पालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. हे पत्र आयुक्तांकडून उपायुक्त करनिर्धारण यांच्या मार्फत शुक्रवारी पालिका चिटणीस विभागाकडे सादर करण्यात आले. चिटणीस विभागाने शुक्रवारी रातोरात या सहाही फुटीर नागरसेवकांना हे कोंकण आयुक्तांचे पत्र पोहचवण्यात आले आहे. या पत्रात सहाही फुटीर नगरसेवकानी आपले म्हणणे लेखी स्वरूपात प्रत्यक्ष येऊन मांडावे असे म्हटले आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने आज (सोमवारी 30 Oct) हे फुटीर नगरसेवक कोंकण आयुक्तांसमोर प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडणार असल्याचे समजते. या सहाही नगरसेवकांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडल्यावर येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय़ लागण्याची शक्यता आहे.