भाजपकडून काँग्रेस फोडण्याच्या हालचाली -
मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद व समन्वय न ठेवल्याने सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली, या प्रक्रियेच्या राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे यापुढे मनसेचा किल्ला आता एकच शिलेदार लढवताना दिसणार आहे. मनसेची ही राजकीय हानी असली तरी कॉंग्रेसला ही हादरा देण्याची तयारी भाजपने केल्याचे समजते. ही जबाबदारी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका आमदारावर सोपविण्यात आली असल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली.मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांशी, नगरसेवकांशी गेल्या काही महिन्यांत संवाद खुंटल्याचा हा परिणाम आहे, असे मनसेतील एका नेत्याने सांगितले. घाटकोपर येथील ‘साईश्रद्धा’ इमारत कोसळून १७ रहिवाशांचा दुदैवी मृत्यू झाला होता. एवढी मोठी दुर्घटना झाल्याच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मनसेचा एकही वरिष्ठ नेता घटनास्थळी न गेल्यामुळे मनसेच्या स्थानिक नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांची कुचंबणा झाली. त्यांना रहिवाशांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. तरीही मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही. ही बाब डॉ. भालेराव यांच्या मनाला जाचत होती. पण त्यांनी पक्षाची पाईक म्हणून वाच्यता केली नाही. अखेर संधी मिळताच त्यांनी मनसेला रामराम केला. मार्चमध्ये झालेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीत ईशान्य मुंबईत जेथे मनसेचे उमेदवार होते, तेथे पक्ष प्रमुखांची एकही सभा झाली नाही. याचीही चर्चा ईशान्य मुंबईत त्यावेळी होऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. महापालिकेत फक्त सात नगरसेवक असूनही त्यांना वेळोवेळी पक्ष प्रमुखांकडून काहीच मार्गदर्शन झाले नाही. त्यामुळे मनसेचे नगरसेवक आपापल्यापरीने पक्षाची बाजू उचलून धरत होते. पण त्यांच्यात एकी नव्हती. त्यात मनसेचे नवनिर्वाचित सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मनसेच्या पालिका गटनेत्यांना वारंवार डावलत होते. परंतु, राज ठाकरेंमुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला होता. काही दिवसापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे हे पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, ते येणार याची माहिती या नगरसेवकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे सर्वच नगरसेवक नाराज होते. अखेर ही नाराजी शुक्रवारी बाहेर आली.
मराठी माणसाला दिलेला इशारा झोंबला - दिलिप लांडे
भांडुपच्या पोटनिवडणुकीत एक नगरसेवक निवडून आल्यानंतर मराठी महापौरांना उठवण्याचा, मराठी माणसाला दिलेला इशारा झोंबल्यामुळेच मनसेच्या नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला असे नगरसेवक दिलिप लांडे यांनी सांगितले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
भांडुपची पोटनिवडणूक जिंकून आल्यानंतर येत्या महापौर निवडणुकीत मराठी महापौरांना उठवण्याचा इशारा दिला. ते मराठी माणसांच्या हिताच्या आड येणारे आहे. ते टाळण्यासाठी मुंबई पालिकेत मराठी महापौरच असणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेनेनेच मुंबईचा विकास केला असून, मराठी हिताच्या आड येणाऱ्यांना तसेच मराठी महापौरांना हटवण्याचा इशारा देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेच्या सहा नगरसवेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे लांडे म्हणाले. मुंबईचा विकास करण्यासाठी, मराठी माणसांचे हित जपण्यासाठी व मराठी सत्ता टिकण्यासाठीच मनसेमधून बाहेर पडून शिवसेनेत आलो आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपकडून काँग्रेस फोडण्याच्या हालचाली -
मुंबई महापालिकेत दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपने पोट निवडणुकीनंतर महापौर बसविण्याचे आव्हान दिले. त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावून भाजपला हादरा दिला. मात्र, भाजपनेही कॉंग्रेसच्यामधील नगरसेवकांना फोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदारावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या आमदारांनी कॉंग्रेसचा एक गट फोडण्याचा विडा उचलला असल्याचे समजते. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेना- भाजपमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपने पोट निवडणुकीनंतर महापौर बसविण्याचे आव्हान दिले. त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेच्या नगरसेवकांना गळाला लावून भाजपला हादरा दिला. मात्र, भाजपनेही कॉंग्रेसच्यामधील नगरसेवकांना फोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदारावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या आमदारांनी कॉंग्रेसचा एक गट फोडण्याचा विडा उचलला असल्याचे समजते. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेना- भाजपमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.