शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा नगरसेवकांची एसीबीकडून चौकशीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2017

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा नगरसेवकांची एसीबीकडून चौकशीची मागणी


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेतील नाट्यमय राजकीय घडामोडींना आता जास्त रंग भरू लागला आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर घायाळ झालेल्या भाजपा आणि मनसेने यात पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी ईडी मार्फत चौकशीची मागणी केली होती. तशीच मागणी मनसेनेही केली होती. आता मनसेमध्ये उरलेले एकमात्र नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असून त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील निवडणुकीत भाजपाची उमेदवार जिंकल्यावर भाजपाचा महापौर बसवण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. याची गंभीर दखल घेत शिवसेनेने मनसेचे आत पैकी सहा नगरसेवक फोडून आल्या पक्षात त्यांना प्रवेश दिला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या दिलीप लांडे, अर्चना भालेराव, हर्षिला मोरे, दत्ता नरवणकर, परमेश्वर कदम आणि अश्विनी माटेकर या सहाही नगरसेवकांना प्रत्येकी 3 कोटी रुपये दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी तर 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी ईडी व लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. सोमय्या यांच्या तक्रारीप्रमाणे या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल. तसेच सोमय्या यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सोमय्या यांना भेटीसाठी वेळ देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

दरम्यान मनसेचे सहा नगरसेवक पक्ष सोडून गेल्यावर एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. ‘शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप लांडे यांच्याकडून मला शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली होती. शिवसेना हा भविष्यासाठी चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले होते,’ शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली गेल्याचा दावा तुर्डे यांनी केला आहे. तुर्डेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून याबद्दलची माहिती दिली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यानी सोमय्या यांच्या तक्रारीची दाखल घेत लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचे म्हटले आहे. त्यातच आता मनसेच्या नागरसेवकानेही मलाही ऑफर दिली होती असा आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शिवसेनेच्या आणि माणसे सोडून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा नगरसेवकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad