महिलांवरील अत्याचाराच्या तपासासाठी महिला पोलिसांचे स्वत्रंत्र पथक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 October 2017

महिलांवरील अत्याचाराच्या तपासासाठी महिला पोलिसांचे स्वत्रंत्र पथक


मुंबई - राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने अश्या अत्याचारांच्या घटनांचा तपास करण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिसांचा समावेश असलेले स्वतंत्र पथक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने यासंदर्भातील ‘जीआर’ काढला असून त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात चार पोलिस अधिकाऱ्यांसह १६ पोलिसांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात येणार आहे.

बलात्कार, विनयभंग, घरगुती हिंसाचार, आत्महत्येला प्रवृत्त करणे, देहविक्रयासाठी भाग पाडणे, अशा महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना वारंवार समोर येत असतात. अशा घटनांचा तपास सर्व अंगांनी व्हावा आणि तो वेळेत पूर्ण होऊन आरोपींविरुद्ध मुदतीत आरोपपत्र दाखल व्हावे या उद्देशाने ही स्वतंत्र पथके सुरू करण्यात येत आहेत. एक पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस नाईक व पोलिस शिपायांचा समावेश असलेले हे १६ जणांचे पथक असणार आहे.

यापूर्वी केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपास कामासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांत तसेच पुणे ग्रामीण, यवतमाळ व अहमदनगर या जिल्ह्यांत स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली होती. मात्र, महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे सर्वत्रच वाढीस लागली असल्याने राज्यातील अन्य जिल्ह्यांतही तपास कामाकरिता अशी स्वतंत्र पथके सुरू करण्यात येणार आहेत. या पथकातील पोलिस कर्मचारी तत्परतेने तपास पूर्ण करण्याबरोबरच दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तसेच महिलांची सुरक्षा व सुरक्षितता याविषयीही या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून काम करतील. 

Post Bottom Ad