मुंबई । प्रतिनिधी - सामान्य मुंबईकरांचे पोट हे रस्त्याकडेच्या हातगाडीवर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांवर भरले जाते. सामान्य मुंबईकर आपले पोट भरण्यासाठी वडापाव, भजी, समोसे इत्यादी पदार्थ खाण्यावर भर देतात. असे पदार्थ मिळणाऱ्या गाड्यांवर खाद्यपदार्थ रद्दीतील वृत्तपत्रात बांधून दिले जातात. वर्तमानपत्रांवरील शाई आरोग्यासाठी धोकादायक असल्याने खाद्यपदार्थ वृत्तपत्रात बांधून देण्याची पद्धत बंद करावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबईत अनेक खाऊ गल्ल्या आहेत तसेच रस्त्यांच्याकडेला खाऊच्या गाड्या लागलेल्या असतात. या गाड्यांवर वडापाव, पॅटीस, भजी, समोरे, पुरी भाजी असे अनेक पदार्थ विकले जातात. अनेकदा गाड्यांवरूनच या पदार्थांची विक्री करताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. ‘फास्टफूड’ प्रकारात मोडणारे हे तळलेले पदार्थ विक्रेते सर्रास वृत्तपत्रांमध्ये बांधून देण्यात येतात. पदार्थ गरम असताना त्यातील तेलामुळे वृत्तपत्रांवरील शाई खाद्यपदार्थांना लागते. वृत्तपत्रांवर छापण्यात येणाऱ्या मजकुरासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. तो या पदार्थांमार्फत लाखो मुंबईकरांचा पोटात जातो. ‘ग्राफाइट’मुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारे कागदांमध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्याच्या पद्धतीवर त्वरीत बंदी आणावी अशी मागणी आशिष चेंबूरकर यांनी केली आहे.