मुंबई । प्रतिनिधी -
मुलांमध्ये असलेले कलागुण बाहेर काढण्याचे काम या ‘ संगीत समारोह’ च्या माध्यमातून साध्य झाले असून भविष्यकाळात या मुलांना कलावंत म्हणून घडविण्याची खरी जबाबदारी आता संगीत शिक्षकांची असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द गायिका व संगीततज्ञ श्रुती सडोलीकर – काटकर यांनी केले.
‘जागतिक संगीत दिन’ निमित्ताने आयोजित या संगीत समारोहाचा शुभारंभ 3 ऑक्टोबररोजी विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात झाला, त्यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे 3 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या संगीत समारोहाचे 29 वे वर्ष आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व पद्मजा वाडकर, शिक्षणाधिकारी महेश पालकर, सर्व उप शिक्षणाधिकारी, संगीत विभागाच्या प्राचार्या सुवर्णा कागल – घैसास हे मान्यवर उपस्थित होते. शुक्रवार, दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता विलेपार्ले (पूर्व) येथे दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात या संगीत समारोहाचा समारोप होणार आहे.
सुप्रसिध्द गायिका व संगीततज्ञ श्रुती सडोलीकर – काटकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, विविध कुटुंबातून आलेल्या मुलांना संगिताचे पैलू पाडण्याचे काम हे संगीत शिक्षक करीत असल्यामुळे शिक्षकांच्या साधनेतच या संगीत कला अकादमीचे मोठेपणे टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना स्वतःच्या आवडीमध्ये एकरुप होण्यासाठी जे आवश्यक गुण आहे ते तुम्ही त्यांना देत असल्यामुळे भविष्यकाळातील संकटे, ताणतणाव यावर ते चांगल्यारितीने मात करु शकतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शिक्षकांना चांगल्या कार्यासाठी त्यांनी शेवटी सुयश चिंतीले. सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर खुप आनंद झाला असून यासाठी परिश्रम घेणाऱया संगीत व नृत्य शिक्षकांचे अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. परमेश्वराशी थेट एकरुप होणारी गायन ही कला असून विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात करियर घडविण्याचे चांगले काम बृहन्मुंबई महापालिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले.