मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील उद्यानांमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चालता यावे यासाठी स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आले आहेत. या जॉगिंग ट्रॅकवर टोकदार आणि चुंबकीय वापराच्या अॅक्युप्रेशर शिट्स बसवल्यास जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांचे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन नागरिकांचे आरोग्य उत्तम राहणार आहे. यामुळे उद्यानांमध्ये अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक बनवण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबईच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित आणि निरोगी राखणे हे प्रत्येकाला कठीण जाते. वेळी अवेळी आहार, जंक फुडचे सेवन करणे, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, यामुळे शरीरावर याचा विपरीत परिणाम होतो. आजकाल तारुण्यातच उच्च रक्तदाब, मधुमेह, हदयरोग, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड ग्रंथीमधील बिघाड इत्यादी वृद्धावस्थेत होणारे गंभीर आजार होत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब चिंताजनक असल्याची चिंता समृद्धी काते यांनी व्यक्त केली आहे. चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये वेदना आणि रोगमुक्त होण्यासाठी अन्य औषधांऐवजी ‘अॅक्युप्रेशर’ या उपचारपद्धतीचा वापर जास्तीत जास्त केला जातो. त्यामुळे याचा अवलंब मुंबईतील उद्यानांमध्येही केला जावा, असे काते यांनी या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.