लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम -
मुंबई । प्रतिनिधी -
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण, पण गेल्या काही वर्षात या सणाचं नातं प्रकाशापेक्षा कानठळ्या फोडणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाशी जोडलं गेले आहे. या फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना आयुष्यभर सहन करावे लागतात. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदुषण होऊन त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. फटाक्यांमुळे कान आणि डोळ्यांसह श्वसनाचे आजार होतात. खास करून त्याचा परिणाम लहान मुलांवर व जेष्ठ नागरिकांवर होतो. असे अभ्यासपूर्ण मत महापालिकेच्या पर्यावरण खात्याने पालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने मांडले आहे.
फटाक्यांमुळे किंवा फटाका फोडल्यावर उडणाऱ्या ठिणग्यांमुळे डोळ्यांवर अतिशय घातक परिणाम होऊन कायमचे अथवा काही काळ टिकणारे किंवा तात्कालिक दोष निर्माण होऊ शकतात. सेंटर फॉर सायन्स एण्ड एन्व्हायर्नमेंट' यांच्या एका अभ्यास अहवालानुसार दिवाळी दरम्यान वायू प्रदूषणाचे प्रमाण हे सात ते आठ पटीने वाढल्याचे दिसून आले. या प्रकारच्या प्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, श्वसन विकाराचे रुग्ण, हृदयरुग्ण आदींवर या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होतो. फटाक्यांमध्ये अनेक घातक आणि प्रदुषणकारी द्रव्ये / रसायने असतात, ज्यामुळे जमीन, हवा आणि पाणी यावर विपरीत परिणाम होतो.
भारतामध्ये 125 डेसिबलपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे. घोषित शांतता क्षेत्राच्या १०० मीटरच्या परिसरात आवाज करणारे तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत फटाके फ़ोडण्यावर बंदी आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे, आगी लागण्याचे प्रमाण दिवाळीत सर्वाधिक असते. 'पर्यावरण संरक्षण कायदा 1986' आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1981’ मध्ये असणाऱ्या विविध तरतुदींनुसार फटाक्यांच्या खोक्यावर फटाक्यातील घटक-रसायनांची माहिती, फटाके फोडताना होणाऱ्या आवाजाची पातळी आदी माहिती छापणे बंधनकारक आहे.
फटाके फोडताना घ्यावयाची काळजी -
-- शक्यतो फटाके फोडणे टाळावे. फोडावयाचेच झाल्यास आवाज न करणारे फटाके फोडावेत.
-- फटाके फोडताना शेजारी पाण्याने भरलेली बादली ठेवावी किंवा लगेच पाण्याचा पुरवठा होऊ शकेल अशा नळाला जोडलेला पाईप ठेवावा. जेणेकरुन काही अपघात झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास तातडीने प्रथमोपचार स्वरुपात पाण्याचा वापर करता येऊ शकेल.
-- फटाक्याला प्रज्ज्वलीत केल्यावर तातडीने दूर होणे आवश्यक आहे.
-- फटाके हे शर्ट, पँट किंवा कपड्यांच्या खिशात कधीही ठेवू नयेत.
-- फटाके काचेच्या किंवा धातूच्या भांड्यात ठेवून फोडू नयेत.
-- फटाके फोडून झाल्यावर फटाक्यांच्या अवशेषांवर पाणी टाकावे, जेणेकरुन त्यातील ठिणगी किंवा उरलेल्या विस्तवामुळे आग लागणार नाही.
-- फटाके फोडताना तो परिसर फटाके फोडण्यासाठी बंदी असलेले क्षेत्र नाही याची खातरजमा करुन घ्यावी.
-- फटाक्यांमुळे उच्च तापमानाची निर्मिती होते. ही बाब लक्षात घेऊन फटाके फोडावेत.
-- फटाका नीट फुटला नसेल किंवा अर्धवट जळाला असेल तर तो पुन्हा फोडण्याचा प्रयत्न अजिबात करु नये; त्याऐवजी सदर फटाक्यावर पाणी टाकून तो फटाका विझवावा.
-- लहान मुले फटाके फोडणार असल्यास पालकांनी किंवा मोठ्यांनी त्यांच्या सोबत राहून काळजीपूर्वक फटाके कसे फोडावेत याबाबत लहानग्यांना मार्गदर्शन करावे.
फटाक्यांमुळे शरिरावर होणारे दुष्पपरिणाम -
--- फटाक्यांमुळे डोळ्यांच्या बाहुल्यांना किंवा बाहुल्यांच्या पारदर्शक पडद्यावर ओरखडे किंवा पडद्याला कायमची इजा होऊ शकते.
-- फटाक्यांमुळे पापण्यांच्या आतील भागास किंवा डोळ्यातील पांढऱ्या भागास म्हणजेच श्वेतमंडलास इजा होऊ शकते.
-- फटाक्यांमुळे डोळ्यांच्या बुबुळांना गंभीर इजा होऊ शकते.
-- फटाक्यांमुळे डोळ्याच्या भिंगाला इजा होऊ शकते.
-- डोळ्यातील दृष्टी संबंधीच्या मज्जातंतूंना फटाक्यांमुळे इजा होऊ शकते.
श्वसनावर होणारा परिणाम --
रंगांच्या फ़टाक्यांमुळे हवेत जड धातू, तसेच श्वसनशील तरंगणारे धुलिकण यांची प्रचंड वाढ होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास असणा-यांचा मूळ आजार बळावतो. जसे की ज्यांना दमा आहे त्यांचा दमा वाढतो. तसेच इतरांच्या फ़ुफ़्फ़ुसांच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच तणाव, थकवा, एकाग्रतेचा अभाव, मळमळ, निद्रानाश, डोकेदुखी, भूक न लागणे यांसारखे इतर परिणामही शरीरावर आणि मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारावर होतात.