मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११६ मध्ये पोट निवडणूक बुधवारी संपन्न झाली. या पोट निवडणुकीत बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी पालिकेत आरोग्य सेविकांनी घेतली आहे. यामुळे मतदान केंद्रांपर्यंत बोगस मतदार पोहचले नसल्याची माहिती वैशाली मलुष्टे या आरोग्य सेविकेने दिली.
भांडुपच्या पोट निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या नुसार मतदारांना चिठ्या घरोघरी वाटण्याची जबाबदारी आरोग्य सेविकांवर देण्यात आली होती. या आरोग्य सेविकांनी घरोघरी मतदार चिठ्या वाटप करताना मृत आणि स्थलांतरित मतदारांच्या चिठ्या वाटप न करता आपल्या जवळच ठेवल्या. तसेच मतदार यादीमध्ये मृत आणि स्थलांतरित अशी नोंद घालून ठेवली. यामुळे मतदानाच्या दिवशी मृत आणि स्थलांतरित मतदारांच्या नावावर कोणीही बोगस मतदान करू शकलेले नाही. आरोग्य सेविका मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी सुरु करण्यात आलेल्या मदत केंद्रात कार्यरत होत्या. यामुळे कोणी बोगस मतदान करण्यास आल्यास त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला असता. परंतू मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करण्यास आल्याचा प्रकार घडलं नसल्याचे मलुष्टे यांनी सांगितले.
डॉ. दत्ता सामंत शाळेतील एका बुथमधील मतदार यादीतील मृत आणि स्थलांतरित २५ मतदारांच्या चिठया असल्याचे निदर्शनास आले आहे. इतर २९ बुथवरमधील मतदार यादीतही असे प्रकार निदर्शनास आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने या मतदार चिठया वाटप केल्या असत्या तर या नावावर बोगस मतदान झाले असते. हे बोगस मतदान होण्यापासून आम्ही रोखल्याचे मलुष्टे यांनी सांगितले. याचवेळी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना पालिकेची आरग्यसेवा पुरवतो. निवडणूक कामातही आम्ही मोलाची कामगिरी करतो. मात्र आम्हाला कमी प्रमाणात मानधन देण्यात येते. आरोग्य सेविकांच्या अनेक मागण्यांकडेही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची खंत मलुष्टे यांनी व्यक्त केली.