मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी मोफत शिक्षण व शालेय वस्तू दिल्या जातात. याशिवाय लांबच्या अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास दिला जातो. यासाठी महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. शैक्षणिक वर्ष अर्धे संपले तरी अद्याप 6 हजार 307 विद्यार्थ्यांना बसपास दिले नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
मनसेचे देवनार विभागप्रमुख अॅड. विजय रावराणे यांनी महिनाभरापूर्वी चेंबूर-वाशीनाका येथील एका पालिका शाळेत भेट दिली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने त्यांनी मुलांच्या गैरहजेरीबाबत विचारणा केली. त्यावर त्यांना बेस्टने मोफत पास न दिल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. रावराणे यांनी याबाबत माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. बेस्टकडे मुंबईतून एकूण 6 हजार 307 विद्यार्थ्यांनी मोफत बसपास मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. यातील 4 हजार 399 स्मार्टकार्ड तयार असून उर्वरित ओळखपत्र तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बेस्टने रावराणे यांना माहिती अधिकारात दिली आहे.
विद्यार्थ्यांकडून मोफत बसपाससाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत हे पास उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. मात्र सहामाही परीक्षा संपली तरीही अद्याप बेस्टने पास न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच पालिका शाळेच्या पटसंख्येवरही त्याचा परिणाम होत आहे. पालिका आणि बेस्टच्या अंधाधुंदी कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे पालिकेने व बेस्टने याबाबत त्वरित निर्णय घेऊन बसपास विद्यार्थ्यांना वाटप करावेत अशी मागणी रावराणे यांनी केली आहे.