मुंबई । प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील के पश्चिम विभागातील जुहू विलेपार्ले परिसरात असणाऱ्या नेहरूनगर या झोपडपट्टी परिसरात उभारण्यात आलेल्या व ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास आज महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट दिली. सुमारे 25 हजार लोकवस्तीच्या या प्रकल्पाचे कौतुक करीत महापालिका आयुक्तांनी परिसरातील नागरिकांचे आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे. आजच्या या भेटी प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापालिका आयुक्तांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रातील ज्या गृहनिर्माण संकुल / व्यवसायिक आस्थापना, ज्यांचे एकूण चटई क्षेत्र हे 20 हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक आहे; किंवा ज्या संकुलांमधून दररोज 100 किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होत आहे; अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणा-या ओल्या कच-याची विल्हेवाट संकुलातच करावयाच्या दृष्टीने प्रकल्प उभारणे व राबविणे, यासाठी 2 ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती. यानुसार संबंधित 5 हजार 304 सोसायट्यांना यापूर्वीच नोटीस देण्यात आल्या आहेत. यापैकी 373 सोसायट्यांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प गेल्या सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत; तर 97 प्रकल्प आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सोसायट्यांच्याच स्तरावर सुरु झाले आहेत.
उर्वरित सोसायट्यांपैकी ज्या सोसायट्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केलेले नाहीत, अशा सोसायट्याना पुन्हा नोटीस देण्यात येणार आहे. यानुसार सुधारित मुदत लवकरच निर्धारित करण्यात येणार असून त्याची माहिती संबंधितांना लवकरच कळविली जाईल. मात्र यानुसार देण्यात आलेली सुधारीत मुदत संपल्यावर या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याच्या आपल्या भूमिकेवर पालिका प्रशासन ठाम आहे. त्याचबरोबर ज्या सोसायट्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत, त्या सोसायट्यांना प्रकरणपरत्वे जास्तीतजास्त 3 महिन्यांची मुदतवाढ दिली जाणार आहे. तसेच अशी मुदतवाढ देतांना सोसायट्यांच्या अडचणी काय आहेत, ते समजून घेऊन संबंधितांना यथोचित मार्गदर्शन केले जाणार आहे. यथोचित मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेतूनच पालिकेने यापूर्वी अनेक ठिकाणी कचरा विषयक प्रदर्शनांचे आयोजन केले होते. तर सर्व 24 विभागात कचरा व्यवस्थापन मदत कक्ष (Help Desk) देखील सुरु केले आहेत, अशीही माहिती महापालिका आयुक्तांनी आजच्या भेटी दरम्यात प्रसार माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.