मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळावे. कंत्राटीकरण, खासगीकरण आणि प्रशासनाच्या आडमुठे धोरण बंद करावे इत्यादी मागण्यांसाठी महापालिकेतील सर्व 40 संघटना एकत्र आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी संघटनांनी समन्वय समिती बनवली असून या समितीच्या नेतृत्वाखाली 5 ऑक्टोबरला पालिकेतील हजारो कर्मचारी महापालिका मुख्यालयावर मोर्चाद्वारे धडकणार आहेत. मागील 17 वर्षानंतर पुन्हा कामगार संघटना एका झेंड्याखाली येऊन आंदोलन करणार आहे, त्यामुळे हा मोठा मोर्चा असेल अशी माहिती संघटनांच्या समन्वय समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समन्वय समितीचे प्रकाश देवदास, महाबल शेट्टी, बाबा कदम आदी उपस्थित होते.
केंद्रातील आणि राज्यातील सरकार सातत्याने कामगार कायद्यांमध्ये एकतर्फी बदल करून कामगार विरोधी धोरण अवलंबत आहे. कामगार चळवळीने कामगारांसाठी मिळवून घेतलेले हक्क या -ना त्या हिरावून घेतले जात आहेत. मुंबई महापालिकेतील कायम कर्मचा-यांची संख्या सातत्याने कमी केली जात असून मोठ्या प्रमाणात बाह्यस्त्रोत, ठेकेदारी पध्दतीने आणि बनावट संस्थांचा आधार घेऊन स्वयंसेवी पद्धतीने कामे करुन घेतल्याचा देखावा उभा करीत आहेत, असा आरोप समन्वय समितीने केला आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना संघटनांसोबत, चर्चा करायला वेळ नाही, पत्राला उत्तर देणे टाऴले जाते. कोणतेही प्रश्न चर्चेने सोडवायचे नाहीत असे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारले आहे. आयुक्तांच्या या कामगार विरोधी धोरणाविरोधात महापालिकेतील 40 मान्यताप्राप्त संघटना एका झेंड्याखाली येऊन लक्षवेधी मोर्चा काढण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे, असे प्रकाश देवदास यांनी सांगितले. 2000 साली कामगारांच्या प्रश्नावर महापालिकेतील सर्व संघटना एकत्र येऊन दोन वेळा संप करण्यात आला होता. आता पुन्हा 17 वर्षानंतर कामगारांच्या 40 संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी होणारा मोर्चात सुमारे 20 ते 25 हजार कामगार, कर्मचारी सहभागी होतील असा दावा समन्वय समितीने केला आहे. बायोमेट्रिक पद्धतीनेच उपस्थिती नोंदवण्याची केली जाणारी सक्ती रद्द करावी, 2016 - 17 चे बोनस - सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी द्यावे, वेतन व भत्ते सुधारावेत, वैद्यकीय योजना पूर्वलक्षी प्रभावाने विनाविलंब सुरु करावी, कंत्राटीकरण, खासगीकरण आणि प्रशासनाच्या मनमानी व आडमुठे धोरण बंद करावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे सांगण्यात आकळे आहे.