मुंबई | प्रतिनिधी 27 Oct 2017 -
मुंबईमध्ये मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन फुटत आहेत. या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा स्थायी समितीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी उचलून धरला. याबाबत पाण्याच्या पाईपलाईन फुटण्याच्या घटनांची दखल पालिकेने घेतली असून पालिकेने मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क ठेवण्यावर भर दिला आहे. अश्या ठिकाणी पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याकडे लक्ष दिले जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जीं यांनी दिली.
स्थायी समितीत सादर करण्यात आलेल्या पालिकेच्या पाणी विभागातील एका प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये ५० हजार लोक राहतात. त्यांच्यापैकी ७५ टक्के लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विभागात पाण्याच्या पाईपलाईनचे काम पालिका करते. मात्र काम झाल्यावर पाण्याचा दाब पुन्हा हवा तसा केला जात नाही. पाण्याचा दाब काम झाल्यावर पुन्हा होता तसा करावा अशी मागणी सातमकर यांनी केली.
तर भाजपाचे विद्यार्थी सिंग यांनी बोरिवलीतील दत्तपाडा येथे पाईपलाईन फुटली होती. पाईपलाईन १६ फूट खाली खोल होती. परंतु पालिकेकडे याची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री नव्हती त्यामुळे दुरुस्तीसाठी तीन दिवस लागले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास झाला. नागरिकांना पियायला, कपडे धुवायला तसेच शौचालयासाठीही पाणी नव्हते. नागरिकांना पाणी नसल्याने स्वखर्चाने २५ टँकर पाणी उपलब्ध लकरून दिले. पालिकेकडून पाण्याचे टँकरही अश्यावेळी मिळत नसल्याचे सिंग यांनी सांगितले. पाण्याची आपत्ती निर्माण झाल्यास एका वार्डात दोन टँकर पालिकेने उपलब्ध करून द्यावेत तसेच पाईपलाईन फुटल्यानंतर २४ तासात दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली.
यावर उत्तर देताना पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जीं यांनी काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन असतात तर काही ठिकाणी खोलवर पाण्याच्या पाईपलाईन आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी वेळ लागतो. अश्या घटना टाळण्यासाठी पालिकेने मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेच्या उपायुक्त इंजिनिअरिंग यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनवण्यात आली आहे. पाईपलाईन फुटल्यास त्याठिकाणी लवकरात लवकर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष दिले जाईल असे मुखर्जीं यांनी सांगितले.