मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देऊनही बोनस देण्यात आले नसल्याने पालिका मुख्यालयावर द्यावा म्हणून पालिका मुख्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेत 30 हजार कंत्राटी कर्मचारी घनकचरा विभागात कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी बोनसच्या मागणीसाठी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे प्रशासनाने मान्य केले. मात्र बोनस देण्याचे पत्र 16 ऑक्टोबरला सायंकाळी उशिरा काढण्यात आले. पत्र उशिरा काढल्याने त्यावर वेळीच कारवाई होऊ शकत नसल्याने या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर बोनस मिळणे शक्य नाही. दिवाळी निमित्त सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने आता या सुटयांनंतरच बोनस मिळणार आहे. दिवाळीचा सण असताना वेळेवर बोनसची रक्कम दिली नसल्याने कंत्राटी कर्मचारी प्रचंड नाराज आहेत. हि नाराजी व्यक्त करण्यासाठी हे कर्मचारी पालिका मुख्यालयावर धडकले होते. यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने मिलिंद रानडे यांच्या उपस्थितीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दिवाळीच्या सुट्टीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणे कठीण आहे. बोनसबाबत पत्रक अगोदरच काढले असते तर दिवाळीच्या आधीच या कर्मचाऱ्यांच्या हातात बोनस मिळाला असता. त्यांना त्यांची दिवाळी सुखात, आनंदात साजरी करता आली असती, असे मिलिंद रानडे यांनी महापौर महाडेश्वर यांच्या निदर्शनास आणले आहे.