बीएसएनएल मुख्यालय आणि निवासी परिसरात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2017

बीएसएनएल मुख्यालय आणि निवासी परिसरात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प


महापालिकेने केला 'बीएसएनएल'चा गौरव -
मुंबई । प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'एच पश्चिम' विभागाच्या कार्यक्षेत्रातील सांताक्रुज पश्चिम परिसरात भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) मुख्यालय व निवासी परिसर आहे. १ लाख ३७ हजार चौरस मीटर आकाराच्या या भूखंडावर तयार होणाऱ्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज केली. अतिशय चांगल्या प्रकारे कचरा वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा प्रकल्प उभारल्याबद्दल महापालिका आयुक्तांनी 'बीएसएनएल' चे अभिनंदन करीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन 'बीएसएनएल'चा गौरव केला आहे. याप्रसंगी बीएसएनएलच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य महाप्रबंधक पियुष खरे, महाव्यवस्थापक एस. के. मिश्रा, अधीक्षक अभियंता डी. के. शर्मा; महापालिकेच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर, आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त रमेश पवार, एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्यासह बीएसएनएल आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेने यापूर्वीच जारी केलेल्या निर्देशांनुसार २० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकारमान असणाऱ्या सोसायट्यांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे विभक्तीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार बीएसएनएलच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाच्या मुख्यालय व अधिकारी निवास परिसरात बीएसएनएल द्वारे आपल्या स्तरावर कचरा विभक्तीकरणासह ओल्या कच-यापासून खतनिर्मिेती करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात दररोज सुमारे १२० किलो ओल्या कचऱ्यावर जीवाणू आधारित प्रक्रिया करण्यात येऊन कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. तर याच परिसरातील उद्यानामध्ये दररोज तयार होणाऱ्या सुमारे १०० किलो कचऱ्यापासून गांडूळ-खत निर्मिती देखील करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खताचा वापर याच परिसरातील झाडांसाठी करण्यात येत आहे, अशी माहिती बीएसएनएल च्या संबंधित अधिकाऱ्यांनी आजच्या भेटी दरम्यान दिली.

बीएसएनएल मुख्यालय परिसरात 'प्लास्टिक क्रशिंग मशीन' देखील बसविण्यात आले आहे. या यंत्रामध्ये प्लास्टिक च्या बाटल्यांचा क्षणार्धात भुगा होतो. ज्यामुळे या प्रकारच्या सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे तुलनेने सुलभ होते. या यंत्राची देखील महापालिका आयुक्तांनी आजच्या भेटी दरम्यान पाहणी केली. या परिसरात महापालिका आयुक्त व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील आजच्या पाहणी-भेटी दरम्यान करण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या आजच्या दौऱ्याप्रमाणेच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल व अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणा-या सोसायट्यांना भेटी देऊन संबंधित सोसायट्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महापालिकेच्या ७ परिमंडळांच्या संबंधित उपायुक्तांनी व सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी देखील आपापल्या परिसरातील सोसायट्यांना भेटी देऊन सोसायट्यांच्या कचरा व्यवस्थापन विषयक कामांचे कौतुक केले आहे.

Post Bottom Ad