मुंबई । प्रतिनिधी -
देशभरात पत्रकारांवर हल्यात वाढ झाली आहे, अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, अनेक पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, गांधी जयंतीनिमित्त सोमवारी निषेध सभा संपन्न झाली. या सभेत पत्रकारांवर होत असलेले हल्ले व त्यांना मिळणाऱ्या धमक्यांविरोधात, सर्व पत्रकार संघटनांनी छोटी-छोटी विभागनिहाय आंदोलने केलीच पाहिजेत. त्याचबरोबर, देशभरातील सर्व पत्रकार, त्यांच्या संघटनांनी एकजूट दाखवून, देशाची राजधानी दिल्लीत एक मोठे आंदोलन करावे, असे आवाहन ‘ओआरएफ’चे सुधींद्र कुलकर्णी यांनी केले.
यावेळी बोलताना, एकजूट दाखविली की, राज्यसत्तेला दखल घ्यावीच लागते. त्यामुळे एक मोठे आंदोलन दिल्लीत व्हायला हवे. त्याचबरोबर, या प्रश्नावरून केवळ विशिष्ट राजकीय पक्षाला लक्ष्य करून, आपल्या आंदोलनाची दिशा भरकटू देऊ नये. सत्ता कोणाचीही असली, तरी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. आपले भांडण अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे, हे लक्षात घेऊन पत्रकारांनी आपला संघर्ष सुरू ठेवायला हवा, असे कुलकर्णी यांनी सांगितले. कोणत्याही घटनेवर व्यक्त झाल्यावर, सध्या टीकेचा भडिमार होत असल्याची खंत लेखिका शोभा डे यांनी व्यक्त केली. काही विशिष्ट गट तत्काळ सक्रिय होतात. निषेधाचा आवाज बुलंद करताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्ष पुढे नेण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. विचारांची गळचेपी व हल्ल्यांचा बळी ठरणाऱ्या पत्रकार व लेखकांच्या मदतीचा विचारही करण्याची गरज असल्याचे व त्यासाठी निधी उभारण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी पत्रकारांनी फॅसिझमसमोर न झुकता, एकजूट दाखविण्याचे आवाहन केले. हल्ल्यामुळे माध्यमांचा आवाज दबणार नसून, लढा सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर यांनीही आपली मते मांडली.