मुंबई | प्रतिनिधी 31 Oct 2017 -
मुंबई महापालिका सभागृह व विविध समित्यांच्या बैठकांत नागरी सुविधांवर पोटतिडकीने आवाज उठविणाऱ्या माजी ज्येष्ठ नगरसेविका वकारून्निसा अन्सारी यांचे मंगळवारी आजारपणामुळे दुखःद निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
प्रथम समाजवादीमधून निवडून आलेल्या अन्सारी यांनी पुढे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून तीन वेळा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी चार वेळा नगरसेवक पद भूषवले होते. स्थायी समिती सदस्य, शिक्षण समिती, ई वॉर्डच्या प्रभाग समिती पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत एमआयएममध्ये प्रवेश केला होता. मात्र, कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते व माजी नगरसेवक ज्ञानराज निकम यांच्या कन्या निकिता निकम यांनी त्यांचा पराभव केला होता. आजारपणामुळे वकारून्निसा यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचारार्थ सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावू लागल्याने तीन दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवले. मंगळवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे प्रभागात आणि मुंबई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.