मुंबई, दि. १८ ऑक्टोबर, २०१७ -
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीने घेतलेला बळी असल्याची संतप्त प्रतिक्रया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.एसटी संपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, सरकारने या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यायला हवे होते आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. त्याऐवजी परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्याच्या व निलंबित करण्याच्या धमक्या देत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात सरकार आणि प्रामुख्याने परिवहन मंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहेत. सरकारच्या अपरिपक्वतेमुळे एकिकडे एसटी कर्मचारी उग्र झाले असून, दुसरीकडे प्रवाशांना दिवाळीला घरी जाण्यासाठी खासगी वाहनांचे अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.