मुंबई । प्रतिनिधी 24 Oct 2017 -
एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेनमधील प्रवास करताना जास्त वजनाचे सामान घेऊन प्रवास करण्यावर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, एल्फिन्स्टन रोड पुलावरील तिकीट खिडकी समोरच्या दिशेस बांधण्याचीही सूचना करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या ऑडिट समितीने केलेल्या सूचनांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन नियम अमलात आणले जाणार आहेत.
एल्फिन्स्टन रोड दुघर्टनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने समित्या नेमल्या होत्या. या समित्यांनी केलेल्या सुचानांनुसार रेल्वेने अहवाल सादर केले. एल्फिन्स्टन रोड पुलावरील चेंगराचेंगरीसाठी फुलांचा भारा कोसळणेही कारणीभूत ठरले आहे. लोकल, स्थानके, प्लॅटफॉर्मवर उसळणाऱ्या गर्दीमध्ये वजनी सामानाचा अडसर आल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असल्याने ही सूचना करण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत जास्त सामानांमुळे अडचणी निर्माण होण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने ऑडिटमध्ये प्रामुख्याने लोकलमध्ये वजनी सामान नेण्यावर निर्बंध आणण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत फर्स्ट क्लासमधील पासधारकास 15 किलो आणि सेकंड क्लासमध्ये 10 किलो इतके सामान नेण्याची परवानगी आहे. हेच प्रमाण तिकीटधारकांसाठी अनुक्रमे 50 आणि 35 किलो इतके आहे. लोकल ट्रेनमध्ये सामान नेण्याची मर्यादा वेगवेगळी असू नये, अशी सूचना सुरक्षा ऑडिटमध्ये करण्यात आली आहे. यामुळे लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रतिप्रवासी 15 किलो आणि सेकंड क्लासमध्ये 10 किलो इतकेच सामान नेण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरील दैनंदिन प्रवाशांची संख्या 35 लाख इतकी असून त्यापैकी 70 टक्के प्रवासी तिकीटधारक आणि 30 टक्के पासधारक आहेत.