मुंबई । प्रतिनिधी -
कोंकण रेल्वेवरील सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसमधील प्रवाशांना खाण्यातून विषबाधा झाली होती. याप्रकरणी रेल्वेकडून जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय, हे कशामुळे घडलं यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. विषबाधा झाल्यामुळे 27 प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तेजस एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान एक्स्प्रेस असून दर रविवारी करमळीहून सीएसएमटीकडे रवाना होते. रविवारी तेजस आपल्या नियोजित वेळेप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाली. एक्स्प्रेसमध्ये नाश्ता म्हणून ऑम्लेट, कटलेट, केक आणि सूप दिले होते. नाश्ता झाल्यानंतर दीड तासाने दोघांना त्रास होऊ लागला. रत्नागिरीपर्यंत 24 जणांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. बाधित प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 3 जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. शिवाय या प्रकरणी कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) स्पष्ट केले आहे.