मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला आहे. संप मागे घेत असल्याचे प्रसिद्धी पत्रक संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा चार दिवस सुरु असलेला संप बेकायदेशीर असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. कोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने राज्य सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबग तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या समितीने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ किती द्यायची, याबाबत तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असेही निर्देश कोर्टाने दिले. उच्चस्तरीय समितीमध्ये अर्थ सचिव, परिवहन सचिव (गृह), परिवहन आयुक्त, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश असणार आहे. तसेच कर्मचारी संघटनेशी चर्चा करण्याचेही आदेश दिले न्यायालयाने आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचे पालन करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे एसटी कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.