मेट्रोच्या कामामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाला तडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2017

मेट्रोच्या कामामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाला तडे


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात 
दुर्घटना घडल्यास मोठ्याप्रमाणात जीवीत हानीची शक्यता
मुंबई । प्रतिनिधी -
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालय परिसरात सुरु असलेल्या कुलाबा - वांद्रे - सीप्झ मेट्रो ३ च्या कामामुळे महाविद्यालयाच्या इमारतीला तडे गेले आहेत. यामुळे याठिकाणी कधीही दुर्घटना घडून हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव जाऊ शकतो अशी भीती प्राचार्य यू. एम. म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. मेट्रो-३ चे काम त्वरीत बंद करा, अशी आक्रमक भूमिका सिद्धार्थमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम राबवली जात असून लवकरच विद्यार्थ्यांच्या सह्याचे हे पत्र मुख्यमंत्री, मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलिसांन पाठवण्यात येणार असल्याचेही प्राचार्य डाँ. उमाजी म्हस्के यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 ला पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून सायन्स, आर्टस्, कॉमर्स आणि लॉ कॉलेजची स्थापना केली. सिद्धार्थ महाविद्यालय आनंद भवन व बुद्ध भवन या दोन इमारतींमधून चालवले जाते. या महाविद्यालयात साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर विधि महाविद्यालयात दिड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयात एकूण १४० कर्मचारी कार्यरत आहेत. सिद्धार्थ महाविद्यालयाची इमारत ही शंभर ते सव्वाशे वर्षे जुनी आहे. इमारत जुनी असल्याने मेट्रोच्या कामामुळे या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. असाच धोका इतरही इमारतींना निर्माण झाला असल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आनंद भवन इमारती सामोरच गेले कित्तेक महिने मेट्रो ३ चे काम सुरु आहे. खोदकाम आणि इतर कामांमुळे महाविद्यालयाच्या इमारतीच्या भिंतींना आणि पिलरला तडे गेले आहेत. जुन्या खांबांचे भागही निखळू लागले आहेत. याकारणाने हेरिटेज दर्जा असलेल्या या इमारतींच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. असेच काम आणखी काही दिवस सुरु राहिल्यास याठिकाणी कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आनंद भवनला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक प्रवेशद्वार संस्थेच्या वादात पोलिसांनी कायमस्वरूपी बंद केल्याने सध्या एकच प्रवेशद्वार सुरू आहे. अश्या परिस्थितीत जर मेट्रो-३ च्या कामामुळे एखादी दुर्घटना घडली, तर विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेर पडणेही अवघड होऊन मोठ्या प्रमाणात जीवीत हानी होण्याची भिती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांकडून व्यक्त केली जात आहे.

मेट्रो ३चे काम गेल्या काही दिवसांपासून नवीन मशिनने सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता महाविद्यालयाच्या इमारतीच्या भिंती हलतात. बेसमेंट आणि काही ठिकाणी इमारतींना तडे गेले आहेत, तसेच मोठ्याने होणाऱ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना प्राध्यापक काय सांगतात, हे ऐकायला येत नाही. या आधी २८ आॅगस्टला एमएमआरसीएला आॅनलाइन तक्रार नोंदविली होती, पण तरीही अजूनही काम सुरूच आहे. इमारत जुनी असल्यामुळे हादऱ्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी मेट्रोचे काम रात्री करावे, अथवा बंद करून अन्य पर्याय शोधावा, अशी मागणी असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य उमाजी म्हस्के यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात -
मेट्रो ३चे काम गेल्या काही दिवसांपासून नवीन मशिनने सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून ध्वनीप्रदूषण, इमारतीला हादरे आणि तडे जाणे हे सर्व त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहेच, पण जीविताचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आमचा विकासाला मुळीच विरोध नाही, पण हा विकास करताना तो योग्य प्रकारे होईल, त्याचा कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी इतकेच आमचे म्हणणे आहे. म्हणूनच आता आम्ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित यातून मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
- डाॅ. उमाजी एम. म्हस्के, प्राचार्य, सिद्धार्थ महाविदयालय

Post Bottom Ad