मुंबई । प्रतिनिधी 23 Oct 2017 -
पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या संताप मोर्चानंतर मनसेने अनधिकृत फेरीवाला हटाव मोहिम सुरु केली आहे. सोमवारी मनसेच्या पदाधिका-यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन फेरावाल्यांच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी महापालिका आयुक्तांनी रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन फेरीवाल्यांविरोधातली संयुक्त कारवाई लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले.
एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने सुविधा व रेल्वे स्थानक परिसरातली जागा अडवून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी 15 दिवसांत अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा अन्यथा 16 दिवशी मनसे हे काम करेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र 15 दिवसांची मुदत संपल्यानंतरही फेरीवाल्यांचे बस्तान कायम असल्याने मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. सांताक्रुझ येथील अनधिकृत फेरीवाल्यांना मनसे स्टाईलने हटवले. मारहाण करून त्यांच्या सामानांची नासधुस करण्यात आली. या प्रकरणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही नोंद झाला आहे. फेरीवाल्यांना हटवताना फक्त उत्तर भारतीय फेरीवाल्यांनाच टारगेट केले जात असल्याने फेरीवाल्यांविरोधातली मनसेची मोहिम वादग्रस्त ठरली आहे. यावर आता राजकारणही सुरु झाल्याचे चित्र आहे. फेरीवाल्यां विरोधातल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी सोमवारी पुन्हा आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली. त्यांनी त्याबाबतचे निवेदनही दिले. सर्व प्रशासकिय यंत्रणांना भेटून सनदशीर मार्गानं फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाने सांगितले. शिष्टमंडळाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेवून फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच मनसेचे शिष्टमंडळ पूर्व आणि पश्चिम रेल्वेच्या पदाधिका-यांनाही याबाबत भेटणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांनी दिली. मात्र ही संयुक्त कारवाई जोपर्यंत प्रभावीपणे सुरु होत नाही तोपर्यंत मनसैनिक आपल्या पद्धतीनं फेरीवाले हटवण्याचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.