मुंबई । प्रतिनिधी -
गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील मोकळ्या जागेत असणा-या अभिनेता शाहरुख खान याच्या प्रॅाडक्शन हाऊसच्या रेड चिलीमधील अनधिकृत हॉटेलवर पालिकेने कारवाई केली. येथील 2 हजार चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडले.
गोरेगाव पश्चिम परिसरामध्ये स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शाहरुख खानचे प्रॅाडक्शन हाऊस आहे. रेड चिलीज या आस्थापनेच्या मोकळ्या जागेत तेथील कामगारांसाठी अनधिकृतपणे हॉटेलचे बांधकाम उभारण्यात आले होते. 2 हजार चौरस फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आले होते. पालिकेने गुरुवारी हे बांधकाम तोडले. या अनधिकृत बांधकाम केलेल्या परिसरात अनधिकृत उपहारगृह चालविले जात होते, अशी माहिती पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली. येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या रेड चिलीज या आस्थापनेच्या परिसरातील असणारी सुमारे २ हजार चौरस फूटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करुन बंद करण्यात आली होती. हे सर्व अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडले. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार – कर्मचारी - अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणा-या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी गॅस कटर, हातोडा यासारखी अवजारेही वापरण्यात आली. असे जाधव यांनी सांगितले.