मुंबई । प्रतिनिधी 27 Oct 2017 -
मुंबई महानगर पालिकेमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे मात्र या राजकीय घडामोडींमुळे पालिकेच्या एल प्रभाग समितीच्या बैठकांना मनसेचे फुटीर नगरसेवक अध्यक्ष दिलीप लांडे अनुपस्थित राहिले. यामुळे शिवसेनेने आपल्या पक्षातील नगसेवकाला अध्यक्ष बनवून सभा सुरु केल्याने राष्ट्रवादी आणि मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला आहे.
मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी आपल्या पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सहा नगरसेवकांनी शिवसनेंत प्रवेश केल्याने त्यांच्या विरोधात कोंकण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत या नगरसेवकांचे पद रद्द करावे, त्यांना पालिकेत प्रवेश देवू नये असे म्हटले आहे. या नगरसेवकांनी करोडो रुपये घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याने याची लाच लुचपत विभाग इडी कडून चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि मनसेने केली होती.
यानंतर मनसेच्या चिटणिसाच्या नावाने या सहा फुटीर नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. या व्हीप नुसार या सहा नागरसेवकांना पालिकेच्या कोणत्याही समितीत मतदान करू नये असे म्हटले आहे. अश्या परिस्थितीत हे सहाही फुटीर नगरसेवक गुरुवारी सभागृहात अनुपस्थित राहिले. शुक्रवारी कुर्ल्याच्या एल प्रभाग समितीमध्ये अध्यक्ष असलेले दिलीप लांडे हे अनुपस्थित राहिले. मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप लांडे अनुपस्थित राहिल्याने शिवसनेने चित्रा सांगळे यांना अध्यक्ष बनविले व कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. तसेच या बैठकीत प्रभागाचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चिटणीस विभागाने उपस्थित नागरसेवकांपैकी वरिष्ठ अश्या नगरसेवकाला अध्यक्ष बनवण्याचा सल्ला दिला नसल्याने सांगळे यांच्या नियुक्तीला राष्ट्रवादीच्या सईदा खान, कप्तान मलिक व मनसेचे संजय तुर्डे यांनी विरोध केला. त्यानंतरही शिवसेनेचे नगरसेवक चिटणीस विभागाकडून कोणताही सल्ला घेत नसल्याने या तिनही नगरसेवकांनी सभात्याग केला. मनसेच्या फुटीर नगरसेवकांबाबत कोंकण आयुक्त जो पर्यंत निर्णय घेत नाहीत तो पर्यंत दिलीप लांडे प्रभाग समितीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यास असेच प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान याबाबत चिटणीस विभागाकडून सल्ला न दिला गेल्याने शिवसेनेने बेकायदेशीरपणे सभा चालवल्याने याची तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी दिली. पालिकेत सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे मात्र प्रभागातील नागरिकांना देण्यात येणारया सोयी सुविधाबाबतचे प्रस्ताव मंजूर करण्यास अडचणी निर्माण होणार असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची चर्चा आहे.