कारभार सुधारा, फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा मनसेस्टाइलने कारवाई करू - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2017

कारभार सुधारा, फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा मनसेस्टाइलने कारवाई करू - राज ठाकरे


मुंबई । प्रतिनिधी - रेल्वेच्या गलथान कारभारामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. भारतीय रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी यात सुधारणा करावी अशी मागणी करताना रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर १५ दिवसांत कारवाई करावी अन्यथा १६ व्या दिवसापासून मनसेस्टाइलने फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. एल्फिस्टन रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेत २३ प्रवाश्यांच्या मृत्यू झाल्याने मनसेद्वारे संताप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर घणाघाती टीका केली. मोर्चाच्या सुरुवातीला चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. रेल्वे आणि सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हजारोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आणि प्रवाशांनी मोर्चात सहभाग घेतला होता.  

एल्फिस्टन - परळ पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ ठार तर ३९ जखमी झाले होते. रेल्वेच्या विरोधात मनसेने संताप मोर्चाची हाक दिली. गुरुवारी सकाळी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मेट्रो सिनेमापासून चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांनी वेढले आहे. १५ दिवसांच्या आत जर हे फेरीवाले हटवले गेले नाहीत तर ते काम माझ्या पक्षाचे कार्यकर्ते करतील, असे सांगत राज यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यापूर्वी रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतचे निवेदन यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. 

पंतप्रधान मोदींवर सडकून टीका करताना, राज म्हणाले की तुम्ही सगळ्या भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहे, तुमच्याइतका खोटारडा पंतप्रधान मी बघितला नाही. इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हा संताप आहे. ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करत आहेत, असे सांगत त्यांनी मोदींचा समाचार घेतला. या देशाने इतके प्रेम दिले, विश्वास टाकला त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. यावेळी नितीन गडकरीवरही त्यांनी शरसंधान साधले. 'अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकच' असा संदर्भ देत अच्छे दिन येणारच नाहीत, हे स्पष्ट केले. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचे खात बदलून त्यांच्या जागी पियुष गोयल यांची वर्णी लावली. मात्र या गोयलांना काय कळतं रेल्वेचं. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा, असे सांगत केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांची खिल्ली उडवली.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन केवळ मुठभरांसाठी आणली जात आहे. त्याकरीता लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही. मुंबईतल्या मूठभर व गुजरातमधल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा डाव असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे, हा डाव हाणून पाडू असा इशारा राज यांनी दिला.

माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही...पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी आमचं घेणदेण नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना विरोध आहे. दरम्यान चर्चगेट- मेट्रो परीसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावर वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच, असेही म्हणाले.

बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले आहेत. सुरेश प्रभूंनी बुलेटट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का? सर्व संपादकांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा, न्यायालयांसह सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की दबावाखाली निर्णय घेऊ नका, देशातल्या घराघराचा कानोसा घ्या या; लोकं सरकारला शिव्या घालताहेत, देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत, असा सवाल ठाकरे यांनी केला.

रतन टाटांच्या सांगण्यावरून मी गुजरातेत गेलो, परंतु आता कळतंय तो मुखवटा होता. खरा विकास झालेला नाही. भाजपामधले लोकपण हा सगळा खोटा मुखवटा असल्याचे खासगीत सांगत सुटले असून विकास वेडा झालाय हे ही भाजमधूनच आलेले घोषवाक्य असल्याचे राज म्हणाले. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून संताप मोर्चाची सांगता करण्यात आली.

Post Bottom Ad