मुंबई । प्रतिनिधी - एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेत 23 प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तत्काळ बैठक घेऊन मुंबईतील 100 रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पुलांचे सुरक्षा आॅडिट करण्यास सुरवात करण्यात आली आहे. या कामासाठी 13 विशेष पथके नेमण्यात आली असून गर्दीच्या वेळी ही पथके स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या आदेशानुसार मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील 76 स्थानकांवर सुरक्षा ऑडिट करण्यासाठी आठ पथके नेमण्यात आली आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान 24 स्थानकांसाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत. या पथकात महापालिका, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आदींचा या पथकात समावेश असून रेल्वे प्रशासनातील इंजिनीअरिंग, वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षा ऑडिटच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या 4 आणि मध्य रेल्वेच्या 6 स्थानकांवरील पादचारी पुलांचे ऑडिट करण्यात आले. यात मध्य रेल्वेवरील करीरोड, ठाणे, कळवा, ठाकुर्ली आणि दिवा तर पश्चिम रेल्वेवरील विरार, नालासोपारा, वसई रोड, नायगाव स्थानकाचा समावेश आहे. या सुरक्षा ऑडिट दरम्यान स्थानकांवरील स्थिती, पादचारी पूल, चढउतार करताना प्रवाशांची होणारी कुंचबणा, स्कायवॉकची उपयुक्त्ता, प्रवेशद्वाराकडील स्थिती, स्थानकांशी जोडलेले रस्ते, तिथल्या अडचणींची पाहणी करण्यात आली. रेल्वेवरील सर्व स्थानकांची पाहणी करून सुरक्षा ऑडीटचा अहवाल येत्या आठवडाभरात रेल्वे प्रशासनाला सादर केला जाणार आहे.