मुंबई । प्रतिनिधी -
रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी ‘क्रिस’मार्फत (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम) मोबाइल अॅप तिकीट सेवा सुरू केली. मात्र या सेवेची माहिती प्रवाश्यांपर्यंत पोहचवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याने याचा वापर कमी प्रमाणात करण्यात येत आहे. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोबाइल अॅप तिकीट सेवा अधिकाधिक विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर ७५ लाख प्रवासी दररोज प्रवास करत असतात. रेल्वेने प्रवास करताना रोज ये जा करणारे प्रवासी पासचा वापर करत असले तरी बहुसंख्य प्रवासी हे तिकीटाद्वारे प्रवास करीत असतात. यामुळे तिकीट खिडक्यांवर प्रवाश्यांच्या रांगा लागलेल्या असतात. या रांगा कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मोबाईल अॅप सेवा सुरु करण्यात आली. या अॅप द्वारे सध्या मध्य रेल्वेवर रोज सात हजार तर पश्चिम रेल्वेवर पाच हजार प्रवासी मोबाइल तिकिट काढत आहेत. ७५ लाख प्रवाशांच्या तुलनेत मोबाइल तिकीट सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य रेल्वेने ही सेवा आता विस्तारण्याचा निर्णय घेतला. यासाठी महाविद्यालय, खासगी आणि सरकारी कार्यालयांत जाऊन माहिती देण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या ‘अॅप’वर मोबाइलवर तिकिट नोंदल्यावर स्थानकात असलेल्या एटीव्हीएम यंत्रावर त्याची छापील प्रत मिळवावी लागत होती. यात बराच वेळ जात असल्याने कागदविरहित तिकिटाचा पर्यायही प्रवाशांना देण्यात आला; मात्र या दोन्ही सेवांकरिता रेल्वेची जीपीएस यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. रेल्वे हद्दीत फक्त ३० मीटर अंतरापर्यंतच जीपीएस यंत्रणा कार्यरत असते. त्यातही अनेक अडथळे निर्माण होत असल्याने तिकीट काढण्यात प्रवाश्यांचा वेळ वाया जात होता. यामुळे रेल्वेने जीपीएसची व्याप्ती वाढविली आहे. आता घरांतही जीपीएस नेटवर्क मिळाल्याने अॅपवरील तिकीट मिळविता येणे शक्य झाले आहे.