नवी दिल्ली 25 Oct 2017 -
भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून यातील १२ कॉरिडोर महाराष्टातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
देशात भारतमाला योजनेअंतर्गत एकूण ६५ हजार ४०० किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार असून पहिल्या टप्प्यात ५ लाख ३५ हजार कोटी रुपये खर्च करुन ३४ हजार ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देऊन नितीन गडकरी म्हणाले, देशात २६ हजार २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आर्थिक कॉरिडोरमध्ये असणार आहे, त्याबरोबर फिडर रुटस् राष्ट्रीय कॉरिडोर, आंतरराष्ट्रीय सीमेवरील रस्ते, कोस्टल व पोर्ट मार्ग, एक्सप्रेस वे व जोड रस्ते असे एकूण ३९ हजार २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश भारतमाला योजनेत करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाअंतर्गत १० हजार किलोमीटर लांबीचे रस्तेही तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. गडकरी यांनी दिली.
महाराष्ट्रात १२ आर्थिक कॉरिडोर -
भारतमाला योजनेअंतर्गत देशातील एकूण ४४ आर्थिक कॉरिडोरपैकी १२ आर्थिक कॉरिडोर महाराष्ट्रातून जात आहेत. यामध्ये मुंबई–कोलकत्ता (१८५४ किमी), मुंबई-कन्याकुमारी (१६१९किमी), आग्रा-मुंबई (९६४ किमी), पुणे-विजयवाडा (९०६ किमी), सूरत – नागपूर (५९३ किमी), सोलापूर-नागपूर (५६३ किमी), इंदोर-नागपूर (४६४ किमी), सोलापूर-बेल्लरी-गुटी (४३४ किमी), हैदराबाद-औरंगाबाद (४२७ किमी), नागपूर-मंडी दाबवली (३८७ किमी), सोलापूर-महबुबनगर (२९० किमी), पुणे-औरंगाबाद (२२२ किमी) या कॉरिडोरचा समावेश आहे. या आर्थिक कॉरिडोरची लांबी ८५०१ किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या या आर्थिक कॉरिडोरमुळे आठ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाणार आहे.
आर्थिक कॉरिडोर १६ जिल्ह्यातून जाणार -
आर्थिक कॉरिडोर १६ जिल्ह्यातून जाणार -
महाराष्ट्रातून जाणाऱ्या १२ आर्थिक कॉरिडोरमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना,नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात तीन रिंग रोड -
महाराष्ट्रात तीन रिंग रोड -
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील २८ शहरांमध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर,धुळे या शहरांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ९ मालवाहतूक तळ -
महाराष्ट्रात ९ मालवाहतूक तळ -
देशात २४ मालवाहतूक तळ निवडण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील ९ शहरे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे, अशी माहिती श्री. गडकरी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.