मुंबई । प्रतिनिधी 25 Oct 2017 -
मुंबईतील प्रवाशांना लवकरच अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या लोकलमधून प्रवास करण्यास मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात येत्या 6 महिन्यांत 24 नव्या लोकल गाड्या दाखल होणार आहेत. या लोकल मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर गरजेनुसार चालवण्यात येणार आहेत.
सध्या मध्य रेल्वेच्या चेन्नई येथील इंट्रिग्रल कोट फॅक्टरी येथे नवीन ईएमयू लोकलची बांधणी वेगाने होत आहे. सिमेन्स आणि बम्बार्डिअर प्रकारातील लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. नवीन लोकलसाठी आवश्यक सर्व परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परिणामी, लवकरच टप्प्याटप्प्याने मध्य रेल्वेवर नव्या लोकल धावणार आहेत. आधुनिक सोईसुविधांनी युक्त असलेल्या 24 लोकल मध्य रेल्वेत दाखल होणार आहेत. स्टेनलेस स्टील बांधणीच्या लोकलमध्ये हवा खेळती राहावी, यासाठी विशेष सोय केलेली आहे. मध्य, हार्बर व ट्रान्स मार्गावरील आताच्या फेऱ्या व प्रवासी संख्या लक्षात घेता आढावा घेऊन कोणत्या मार्गावर या लोकल चालवाव्यात यावर निर्णय घेण्यात येईल. सध्याचे वेळापत्रक आणि गर्दी लक्षात घेऊन नव्या लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळेत दर चार मिनिटांनी लोकल धावते. तर हार्बर मार्गावर दर आठ मिनिटांनी लोकल धावते. परिणामी, मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या लोकल हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावरही धावतील, असे संकेत देण्यात आले आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रशस्त जागा असलेले ठाकुर्ली हे यार्ड आहे. येथे 24 लोकल उभ्या राहू शकतात. ठाणे स्थानकाजवळ 10 लोकल उभ्या करण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर व कर्जत येथेही लोकल उभी करण्याची व्यवस्था आहे. परिणामी, नव्या गाड्या उभ्या करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे.