प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, धनंजय मुंडे करणार नेतृत्व -
परळी दि.21 Oct 2017 - शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवार दि.23 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व जिल्ह्यातील नेते मंडळी करणार असून, या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले आहे.
राज्य शासनाने कर्ज माफीची घोषणा केली असली तरी अद्याप शेतकर्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, अटी व शर्ती लागु करून लाखो शेतकर्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे अद्याप साधे पंचनामेही झालेले नाहीत, मागील वर्षीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. लोडशेडींगमुळे जिल्ह्यातील जनता त्रस्त झाली असून, खरीप हंगामातील शेतकर्यांच्या हक्काचा पिक विमाही त्यांना मिळालेला नाही. महागाई गगनाला भिडली असून, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. बीडच्या नागरिकांची पुलाअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. शेतकर्यांच्या शेती अवजारांवर जी.एस.टी. आकारला जात आहे. शेतकर्यांना त्यांच्या शेतातील नादुरूस्त डी.पी. ही बदलुन मिळत नसल्याने पाणी असूनही त्यांची पिके वाळत आहेत. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्यांच्यात तिव्र असंतोष पसरला आहे. शेती मालाला हमी भाव नाही आणि खरेदी केंद्र ही अद्याप सुरू झालेली नाहीत, मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. समाजातील प्रत्येक घटकात त्यामुळे असंतोष असून, केंद्र आणि राज्यातील सरकारने अच्छे दिनाच्या नावाखाली आपली फसवणुक केल्याची भावना जनतेत निर्माण झाल्याने हा रोष व्यक्त करण्यासाठी हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजता आंबेडकर पुतळा बीड येथुन सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून तेथे मान्यवर नेत्यांची भाषणे होणार आहेत. या मोर्चात माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ.अमरसिंह पंडित, माजी आ.उषाताई दराडे, पृथ्वीराज साठे, सय्यद समिल, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक नेते संदिप क्षीरसागर, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई फड, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे हे ही सहभागी होणार असून, जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चाची जिल्हाभर जय्यत तयारी करण्यात येत असून, हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करुन त्यांचा सातबारा कोरा करा, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन मदत द्या, बीड जिल्ह्यातील लोडशेडिंग तातडीने बंद करा, बीडच्या बायपास रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करा. पुर्वीच्या पुलावरून लहान वाहनांची वाहतुक सुरू करा, मागील वर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या, खरीप हंगामातील पिक विमा तातडीने शेतकर्यांना वाटप करा, महागाई कमी करा, पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घ्या, पेट्रोल डिझेलवरील सर्व कर हटवुन जि.एस.टी. लावुन विक्री करावी, शेतकर्यांचे ट्रॅक्टर, शेती अवजारांना जी.एस.टी मधुन सुट द्यावी, शेतकर्यांच्या शेतातील नादुरूस्त डीपी दुरूस्त करून देण्यात याव्यात, सरसकट कर्ज माफ करण्यात यावे. (मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व 12 बलुतेदार), मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्या, शेतमालाला हमीभाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे मांडण्यात येणार आहेत.