मनसेच्या चार फुटीर नगरसेवकांच्या घरवापसीची अफवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 October 2017

मनसेच्या चार फुटीर नगरसेवकांच्या घरवापसीची अफवा


मुंबई । प्रतिनिधी 25 Oct 2017 -
मनसेच्या नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यावर सहाही नगरसेवक आपल्या कामात गुंतले असतानाच यापैकी चार नगरसेवकांनी घरवापसीसाठी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती.

मनसेमधील पदाधिकारी वरिष्ठ नगरसेवकांना किंम्मत देत नव्हते. खुद्द राज ठाकरे या नगरसेवकांना भेट देत नव्हते. यामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रश्न निर्माण झाल्याने मनसेच्या सात पैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिट्ठी दिली होती. मनसेमधून बाहेर पडताना आपला गट बनवत सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसनेंत प्रवेश केल्याने भाजपा आणि मनसेमध्ये खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी करोडो रुपये घेऊन पक्ष प्रवेश केल्याचा आरोप भाजपा आणि मनसेकडून करत याची चौकशी लाच लुचपत विभाग व इडी कडून करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत मनसेने आपल्या नागरसेवकांविरोधात कोंकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. कोंकण आयुक्त या घडामोडी दरम्यान सुट्टीवर असल्याने आजही हे सहा नगरसेवक तांत्रिकदृष्टया मनसेचे सदस्य आहेत.

गुरुवारी महापालिकेची महासभा असल्याने सभागृहात या फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा करण्याची व्युव्हरचना सत्ताधारी शिवसेनेने आखली होती. मात्र कोंकण आयुक्त रजेवर असल्याने फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या प्रकरणावर कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे मन विचलित करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर सहा पैकी चार नगरसेवक राज ठाकरे यांना भेटणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. अशी अफवा पसरवली जात असताना फुटीर नागरसेवकांपैकी तीन नगरसेवक महापौरांसोबत साकीनाका येथील पालिकेच्या कार्यक्रमात उपस्थिती होते. दिलीप लांडे आणि दत्ता नरवणकर हे दोन नगरसेवक मनसेपासून दुखावले असल्याने काहीही झाले तरी पुन्हा मनसेमध्ये जाणे शक्य नाही. अशी परिस्थिती असतानाही याची कोणतीही खातरजमा न करता सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या संदेशामुळे राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली होती.

दरम्यान याबाबत दिलीप लांडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेसोबत आहोत असे सांगितले. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे दिलीप लांडे यांनी सहाही नगरसेवकांच्या सह्यांसह प्रसिद्ध पत्रकही काढले आहे. दिलीप लांडे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकावर सहाही नगरसेवकांच्या सह्या असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवण्याचा प्रयत्न फसल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad